व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Cabinet reshuffle : मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेत शिंदेंच्या ‘ या’ शिलेदाराचे नाव

Cabinet reshuffle : मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेत शिंदेंच्या ‘ या’ शिलेदाराचे नाव

Efforts for cabinet entry of leaders in exileb : अज्ञातवासात असलेल्या नेत्यांचे ‘एन्ट्री’ साठी देव पाण्यात

 

Mumbai : राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना सध्या चांगलाच जोर चढलेला असताना, अनेक विद्यमान मंत्र्यांच्या पदांवर गंडांतर निर्माण झाले आहे. काही जुन्या चेहऱ्यांची पुन्हा एंट्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्येच शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे नाव नव्याने चर्चेत आले आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून मंत्रिपदापासून दूर असलेले सावंत आता पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळवणार असल्याच्या चर्चांना एका भेटीमुळे उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पुण्यात तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यामुळे सावंत समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ही भेट राजकीय पुनरागमनाचे संकेत म्हणून पाहिली जात आहे. याआधी सावंत हे शिंदे गटाचे महत्त्वाचे शिलेदार मानले जात होते. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Parinay Fuke : नाना पटोलेंनी ग्रामपंचायतीमध्ये लक्ष द्यावे, राज्यात त्यांना स्कोप नाही !

 

मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नावही चर्चेत आहे. काही वेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेले कोकाटे यांच्यावर पक्षांतर्गत नाराजी वाढत असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या जागी नव्याने कुणाला संधी दिली जाईल, यावर चर्चांचा केंद्रबिंदू सध्या स्थिरावलेला आहे. काही राजकीय वर्तुळांमध्ये कोकाटे यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात आणण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता ही शक्यता मागे पडत असल्याचे दिसत आहे आणि त्याजागी तानाजी सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री आणि सावंत यांची भेटीकडे राजकीय वर्तुळात वेगळ्याच नजरेने पाहिले जात आहे. एका बाजूला ही भेट सावंत यांच्या राजकीय पुनरागमनाचा संकेत म्हणून पाहिली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला यामुळे मंत्रिमंडळातील सध्याच्या कुठल्या मंत्र्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, याची चर्चा तापली आहे.

Vijay Wadettiwar : ..तर सरकार नालायक आहे, असा शिक्का लागेल !

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची आज सकाळी बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच दिवशी दुपारी मंत्रिमंडळाची बैठक नियोजित आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढत असतानाच ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. याआधी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी वर्गाची नाराजी पक्षाला परवडणारी नाही, असे स्पष्ट संकेत पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत.

Social media : सावधान… समाज माध्यमावरील टीका ठरणार शिस्तभंग !

 

राज्याच्या राजकारणात आगामी काळात काही प्रमुख चेहरे बदलणार असल्याचे संकेत सध्या मिळत असून, शिंदे गटामध्ये अंतर्गत हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा स्थितीत तानाजी सावंत यांचं नाव पुन्हा चर्चेत येणं, ही एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड मानली जात आहे. राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेत अज्ञातवासात असलेले अनेक मंत्री पुन्हा आस लावून बसले आहेत.

error: Content is protected !!