Farmers protest for various demands including loan waiver : मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
Jalgao Jamod तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांनी तहसील कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले. सरसकट कर्जमाफी, पीकविमा, अतिवृष्टी व हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत नुकसानभरपाई मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी युवा नेते अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी बोलताना अक्षय पाटील म्हणाले, “शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून, दररोज ८ ते ९ शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. तरीही सरकार कर्जमाफीसंदर्भात ठोस भूमिका घेत नाही, हे दुर्दैवी आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा कोरा करून सरसकट कर्जमाफी द्यावी, २०२३-२४ सालाचा उर्वरित पीकविमा तातडीने वितरित करावा, तसेच अतिवृष्टी व हुमणी अळीच्या नुकसानीबाबत पंचनामे करून भरीव मदत द्यावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, अशी तक्रार करत “शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहे,” असा आरोप निवेदनातून करण्यात आला. हजारो हेक्टरवरील पीक हुमणी अळीमुळे बाधित झाले असून, शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Hybrid annuity scheme : २०० कोटींचा रस्ता, दोन वर्षही नाही टिकला!
शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. तहसीलदार पवन पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात शिवदास खिरोडकर, अनिल सिंह राजपूत, सदाशिव गवई, समाधान गवई, भाऊजी पाटील, वैभव जाणे, अजय गिरी, आकाश आटोळे, सोपान पाटील, गजानन अढाव, आदित्य भालतडक, राजूभाऊ नितवणे यांच्यासह ५० पेक्षा अधिक कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.








