maharashtra-farm-loan-waiver-first-beneficiary-list-to-be-announced-dattatray-bharne : ३० जुलैपूर्वी खात्यात रक्कम कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा
Mumbai : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफी योजनेची प्राथमिक लाभार्थी यादी मंगळवारी जाहीर केली जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. तसेच, ३० जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, “उद्याच आम्ही कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आयकर परताव्याबाबतचा आवश्यक डेटा केंद्राकडून प्राप्त झाला असून तांत्रिक अडचणीही दूर झाल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया आता वेगाने पूर्ण केली जाईल.”
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रिमंडळ बैठकीत ३० जुलैपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करण्याचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. त्यानंतर आता कृषीमंत्र्यांच्या घोषणेमुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेला अधिकृत गती मिळाल्याचे मानले जात आहे.
Chaityabhumi Protest : चैत्यभूमीवरील ३५० आंदोलक ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
बोगस बियाणे प्रकरणातही मोठी कारवाई : कर्जमाफीसोबतच राज्यातील बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांवर सरकारने कठोर कारवाई सुरू केल्याची माहितीही कृषीमंत्री भरणे यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, खरीप २०२५ हंगामात बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत ११ हजार ५८४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी ८ हजार १९२ प्रकरणांची तपासणी पूर्ण झाली असून, ७६३ नमुने प्रयोगशाळेत अमान्य ठरले आहेत. या प्रकरणात ८१ बियाणे कंपन्यांविरोधात गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत.
विदर्भात सर्वाधिक तक्रारी : बियाण्यांच्या निकृष्ट गुणवत्तेबाबत सर्वाधिक तक्रारी अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांतून प्राप्त झाल्या आहेत. तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींची तपासणी सुरू असून दोषी कंपन्यांवर कायदेशीर कारवाईचा धडाका सुरू असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
सोयाबीन पेरणी आणि बियाण्यांची स्थिती : कृषी विभागाच्या अहवालानुसार, राज्यात यंदा सोयाबीनचे सरासरी पेरणी क्षेत्र ४७.१२ लाख हेक्टर असून, १९ जुलैपर्यंत ४१.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यासाठी १३.१२५ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असताना राज्यात १८.५७ लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध असल्याचे सरकारने सांगितले आहे.
या कंपन्यांविरोधात कारवाई : निकृष्ट बियाणे पुरवल्याप्रकरणी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि., रवी हायब्रीड सीड्स अँड रिसर्च (अकोला), यशोदा आणि पार्श्व जेनेटिक्स एलएलपी यांसह अनेक कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोषी कंपन्यांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशाराही कृषी विभागाने दिला आहे.
Sansad March Violent : दिल्लीतील ‘संसद मार्च’ हिंसक; ७८ आंदोलक ताब्यात
कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना त्याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता उद्या जाहीर होणाऱ्या प्राथमिक यादीकडे लागले आहे.








