Maratha reservation movement gains momentum : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला वेग
Mumbai : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केले आहे. बीडमध्ये घेतलेल्या इशारा बैठकीत त्यांनी “तुमचे आमदार, खासदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य कुणालाही घरी बसू देऊ नका” असे स्पष्ट आवाहन समाजाला केले होते. या हाकेला प्रतिसाद देत मराठवाड्यातील अनेक आमदार-खासदारांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग जाहीर केला आहे.
माजलगावचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके यांनी सुरुवातीपासूनच आंदोलनाला पाठिंबा दिला असून, मुंबई आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. बीडचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांनी “चलो मुंबई” असा नारा दिला आहे. खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बजरंग सोनवणे यांनीदेखील “मी खासदार झालोय ते जरांगेंच्या पाठिंब्यामुळे” असे म्हणत आंदोलनात जोरदार सहभाग नोंदवला आहे.
गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सोशल मीडियावर घोषणा करत मतदारसंघभर पोस्टर्स लावले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारला तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे. धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी नागरिकांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे. तर परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी व्हिडिओ संदेशातून सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे.
Vanchit Bahujan Aghadi : रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ‘जवाब दो’ ठिय्या आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे. हैदराबाद गझेटियर लागू करावा, सगे-सोयरे अध्यादेश प्रभावी करावा, आंदोलनादरम्यान झालेल्या गुन्ह्यांची मागे घेण्यात यावे आणि बलिदान दिलेल्या कुटुंबांना न्याय द्यावा, या त्यांच्या ठाम मागण्या आहेत.
“जोपर्यंत मागण्यांवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही,” असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मराठवाड्यातील नेत्यांचा वाढता पाठिंबा या आंदोलनाला वेग देणारा ठरत आहे आणि राज्य सरकारकडून कोणता निर्णय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
____








