Chief Minister Fadnavis big revelation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
Mumbai : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाचा आज चौथा दिवस. पहिल्याच दिवशी आंदोलकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. पाऊस, बंद हॉटेल्स आणि खाऊगल्लीतली दुकानं यामुळे आंदोलक उपाशी राहिल्याचे आरोप झाले. यामागे सरकारने आंदोलकांचं अन्न-पाणी जाणीवपूर्वक बंद केलं, असा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठा खुलासा केला आहे.
फडणवीस म्हणाले की, पहिल्या दिवशी काही आंदोलकांनी धुडगूस घातल्याने व्यापारी घाबरले आणि दुकानं बंद करून निघून गेले. त्यानंतर सरकारवर उपोषणकर्त्यांना उपाशी ठेवण्याचा आरोप करण्यात आला. “प्रत्यक्षात कुणीही असं केलं नव्हतं. व्यापारी भीतीमुळे गेले होते. आम्ही स्वतः व्यापाऱ्यांना सांगितलं की, दुकानं उघडी ठेवा. आम्ही पोलीस फोर्स देतो. कुठेही काही चुकीचं घडू देणार नाही. आता दुकानं उघडी आहेत,” असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
आंदोलकांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी म्हटलं की, काही घटना अशा घडल्या ज्या भूषणावह नाहीत. “छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक अशा प्रकारे वागले, तर आपण संस्कृतीचा आणि छत्रपतींच्या नावाचा अपमान करत आहोत का, असा प्रश्न निर्माण होतो,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, चर्चेच्या मुद्यावरूनही फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. “चर्चा माईकवरून होत नाही. आंदोलकांनी दिलेलं निवेदन आम्ही घेतलं आहे. त्यातून उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारला कुठलाही इगो नाही. चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर मार्ग निघेल,” असे ते म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाने होणार विदर्भाचा विकास !
याचबरोबर, फडणवीसांनी विरोधकांवरही टीका केली. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव घेत त्यांनी सांगितलं की, सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणं थांबवलं पाहिजे. “प्रश्न इतके का चिघळले हे त्यांनी स्वतःला विचारावं. अडीच वर्ष सत्तेत असताना मराठा आरक्षणावर एकही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे यावर राजकारण करणं योग्य नाही,” असा हल्लाबोल फडणवीसांनी केला.








