Amravati Municipal Polls Hit by “Divide-and-Rule Politics” : तरीही इच्छुकांमध्ये संभ्रम, राजकीय पक्षांसाठी नव्या गणिताचा अभ्यास
Amravati अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. कुणाच्या प्रभागात नवे भाग जोडले गेले, तर कुणाच्या पारंपरिक गडाचे तुकडे झाले. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांसमोर नवे गणित उभे राहिले आहे. त्यातच आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यासाठी कोणाचा खांदा वापरून कुणावर निशाणा साधला जातो आहे याबाबतच्या राजकीय चर्चांना चांगलाच उत आला आहे.
या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. फोडाफोडीचे राजकारण या निवडणुकीत मुख्य आकर्षण ठरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना रसद पुरवून आपल्या गोटात खेचण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत.
OBC Reservation : ओबीसींची व्युहरचना ठरली, दोन स्तरांवर लढणार आरक्षणाची लढाई !
तब्बल आठ वर्षांनी होणारी ही निवडणूक नव्या समीकरणांसह होत असल्याने राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या फूटीनंतर राजकीय परिस्थिती बदललेली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपची धुरा माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी सांभाळली होती. मात्र, सध्या ते काँग्रेसमध्ये असून भाजपची सूत्रे माजी खासदार नवनीत राणा यांच्या हातात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आमदारद्वय संजय व सुलभा खोडके यांचे बळ मिळाले आहे, तर शिवसेना शिंदे गटाने माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांना पक्षात घेऊन आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला नव्याने बांधणी करावी लागत आहे. उद्धव ठाकरे गटाने अमरावतीत अकोल्यातून आयात उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय डाव साधण्यास सुरुवात केली आहे.
Threat to officer : आधी आयपीएस अंजना कृष्णांच्या चौकशीची मागणी !
आगामी काळात फोडाफोडीच्या राजकारणाला आणखी गती मिळेल, अशी चिन्हे आहेत. पक्षाकडून प्रभावी उमेदवारांची मनधरणी सुरू झाली आहे. पैशाची ताकद असलेल्या पक्षातच प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची चढाओढ वाढली असल्याचे दिसून येत आहे. एकूणच, अमरावती महापालिकेची ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना घडवणार आहे. मात्र, शेवटच्या क्षणी कोण कोणत्या पक्षाकडे वळते, हा खरा राजकीय उत्सवच ठरणार आहे.








