rohit-pawar-hunger-strike-laxman-hake-gopichand-padalkar-criticism-rajendra-pawar-emotional-appeal : वडील राजेंद्र पवारांची भावनिक साद; ‘मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय’
Pandharpur : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस गाठला असतानाच या आंदोलनावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. एका बाजूला रोहित पवारांच्या आंदोलनाला शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळत असताना, दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. तर आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी भावनिक शब्दांत मुलाच्या आंदोलनाचे समर्थन करत शेतकऱ्यांना साथ देण्याचे आवाहन केले आहे.
पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनादरम्यान राजेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना भावनिक भूमिका मांडली. ते म्हणाले, “मी जरी रोहितचा वडील असलो तरी मी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय. त्यामुळे आता शेतकरी हाच त्याचा खरा आधार आहे.” रोहित पवार हे स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी नव्हे, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजेंद्र पवार यांनी सरकारवरही टीकेची झोड उठवली. शेतकरी आणि नागरिकांनी आपला आवाज उठवला नाही तर सरकारला कधीच जाग येणार नाही, असे सांगत त्यांनी सरकार त्यांच्या धुंदीतच असल्याचा आरोप केला. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या गावात, तालुक्यात किंवा जिथे शक्य असेल तिथे या प्रश्नावर भूमिका मांडली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
El nino : दुष्काळाचे संकट ; काही भागांत कमी तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
दरम्यान, रोहित पवार यांनी कर्जमाफीच्या शासन निर्णयातील दोन प्रमुख अटींवर आक्षेप घेत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची अट आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी पुढील दोन वर्षांचे पीक कर्ज भरणे अनिवार्य करण्याची अट यामुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असा त्यांचा दावा आहे. या जाचक अटी रद्द होईपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, या आंदोलनावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. पवार कुटुंबातील व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसणे म्हणजे ‘मर्सिडीज कारला नांगर जुंपण्यासारखे’ असल्याचा टोला त्यांनी लगावला. रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि त्यांनी आठवडाभर आंदोलन करावे, असा उपरोधिक सल्लाही हाके यांनी दिला.
लक्ष्मण हाके यांनी पुढे पवार कुटुंबावरही गंभीर आरोप केले. महाराष्ट्रातील शेती, सहकार क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थांबाबत पवार कुटुंबाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, ज्या कुटुंबावर शेतकऱ्यांना संकटात ढकलल्याचा आरोप केला जातो, त्याच कुटुंबातील वारसाने शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसणे हे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही रोहित पवारांच्या आंदोलनावर निशाणा साधला. हे आंदोलन केवळ नाट्य निर्माण करण्यासाठी असल्याचा आरोप करत त्यांनी रोहित पवारांना अभिनय चांगला जमत असल्याची टीका केली. “हे आंदोलन आहे की चित्रपटाचे शूटिंग?” असा सवाल करत पडळकर यांनी उपोषणाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पडळकर यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साखर कारखानदारांकडून पूर्ण एफआरपी मिळेपर्यंत रोहित पवार यांनी आंदोलन सुरूच ठेवावे. तसेच पवार कुटुंबानेच राज्यातील शेतकऱ्यांची सर्वाधिक लूट केल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, रोहित पवार यांच्या आंदोलनाला विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळत असून अनेक शेतकरी आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. सरकारकडून चर्चेचे प्रयत्न सुरू असले तरी कर्जमाफीतील जाचक अटी हटविण्याबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका रोहित पवार यांनी कायम ठेवली आहे.
एकीकडे वडील राजेंद्र पवार यांची भावनिक साद, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका यामुळे पंढरपूरमधील हे आंदोलन आता केवळ शेतकरी प्रश्नापुरते मर्यादित न राहता राज्यातील राजकीय संघर्षाचे नवे केंद्र बनले आहे. त्यामुळे सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेते आणि पुढील काही दिवसांत कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
_








