व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Nitin gadkari : हा तर फक्त विकासाचा ट्रेलर, पेट्रोल-डिझेलची मक्तेदारी संपणार

Nitin gadkari : हा तर फक्त विकासाचा ट्रेलर, पेट्रोल-डिझेलची मक्तेदारी संपणार

Nitin Gadkari Announces Launch of Hydrogen Fuel Pump in Nagpur : नितीन गडकरी यांनी दिले 12 वर्षांचे रिपोर्टकार्ड; नागपुरात हैड्रोजन पंप सुरु करण्याची घोषणा

Nagpur गेल्या १२ वर्षांत देशात पायाभूत सुविधांचा इतका अभूतपूर्व विकास झाला आहे की, ते सांगता सांगता आता मी स्वतः थकून गेलो आहे. पण हे लक्षात ठेवा, जे झाले तो तर फक्त ‘ट्रेलर’ होता, खरा सिनेमा अजून बाकी आहे. आगामी काळात भारताला पेट्रोल आणि डिझेलसाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची अजिबात गरज पडणार नाही,असा विश्वासू केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी पत्रकारांशी संवाद साधत होते. नेहमीप्रमाणेच आपल्या कामाचा धडाका आणि भविष्यातील व्हिजन मांडत त्यांनी विरोधकांवर आणि जुन्या व्यवस्थेवर कडाडून टीका केली.

देशातील बदलेल्या चित्राचा पाढा वाचताना गडकरी म्हणाले की, पूर्वी देशात दीड कोटी नागरिक सायकल रिक्षा ओढत होते, त्यांचे हे मानवी शोषण आम्ही ‘ई-रिक्षा’ आणून कायमचे संपवले आहे. देशात १२ मोठे आणि २०० छोटे पोर्ट विकसित करून ते रस्त्यांनी जोडले आहेत. वंदे भारत आणि विमानतळांच्या विकासामुळे आज ‘हवाई चप्पल’ घालणारा सामान्य माणूसही हवाई प्रवास करत आहे. डिजिटल क्रांतीमुळे थेट बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने मधल्या दलालांचा भ्रष्टाचार आणि बँकांवरील ‘एनपीए’चे संकट संपले असून गरिबांना सहज कर्ज मिळत आहे. याशिवाय, देशातील कोळसा आणि रॉकेलचा काळाबाजार ‘उज्वला गॅस’ योजनेमुळे बंद पडला असून, पूर्वी पाण्यासाठी होणारे ‘मडके आंदोलन’ आता पूर्णपणे थांबले आहे.

Rohit pawar hunger : ‘मर्सिडीजला नांगर जुंपल्यासारखं उपोषण’; हाके – पडळकरांचा हल्लाबोल !

कचरा व्यवस्थापन आणि बायो-फ्युएलवर बोलताना गडकरींनी त्यांच्या खास शैलीत सांगितले की, एक काळ असा येईल की लोक कचऱ्यासाठी भांडतील, कारण हा कचरा आता रस्ते निर्मितीत वापरला जात आहे. ज्या राखेची विल्हेवाट लावणे ही मोठी समस्या होती, ती राख आता शोधूनही मिळत नाही. आता आमचे शेतकरी बायो-वेस्टपासून डांबर बनवणार आहेत. आज 100 टक्के इथेनॉलवर चालणारी मारुती वॅगनआर लाँच झाली आहे. मी जेव्हा पाण्याच्या हायड्रोजनवर गाड्या चालवण्याच्या गोष्टी करायचो, तेव्हा लोक माझ्यावर हसायचे, अपप्रचार करायचे. पण आता येत्या तीन महिन्यांत हायड्रोजन पंप सुरू होत असून रस्त्यांवर नवनवीन पर्याय निर्माण झाले आहेत. जनतेचा आमच्यावर किती विश्वास आहे याचे उदाहरण म्हणजे, युद्ध सुरू असताना आम्ही जे बॉण्ड्स काढले होते, ते ७ दिवसांऐवजी अवघ्या ७ तासांत विकले गेले.

महामार्गांच्या जाळ्याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, नागपूर-हैदराबाद आणि नागपूर-चंद्रपूर हायवेमुळे नागपूर ते हैदराबाद हे अंतर केवळ ३ तासांत पूर्ण होईल, तसेच नागपूर-रायपूर हायवेचे कामही लवकरच सुरू होणार आहे. रस्त्यांच्या विकासामुळे नवा रोजगार निर्माण झाला असून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट्स’ नष्ट केले आहेत.

El nino : दुष्काळाचे संकट ; काही भागांत कमी तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

पर्यावरणाबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून आतापर्यंत साडेचार कोटी झाडे लावली आहेत आणि नागपूर जिल्ह्यात २५ लाख झाडे लावण्याचा संकल्प आहे. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे सर्व तालुक्यांचे मॅपिंग करून फॉरेस्ट कव्हर वाढवले जाईल, ज्यामुळे संपूर्ण चित्र बदलेल.
शेवटी गडकरी म्हणाले की, ‘डबल इंजिन’ सरकारमुळे देशात जनतेच्या अपेक्षेपेक्षा जास्त कामे झाली आहेत, ज्याचा हिशोब लावणेही कठीण आहे. या सर्व अद्भूत विकासाचे श्रेय माझे नसून देशातील जनतेचे आहे, ज्यांनी जात, पात, पंथ न बघता विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिले.

error: Content is protected !!