Youth commits suicide by writing note for reservation : आरक्षणासाठी सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या
Dharashiv : मराठा आरक्षणासाठी लागू केलेल्या हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती एसटी 7 प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील एका युवकाने आत्महत्या केली. पवन गोपीचंद चव्हाण (वय 32) असे या तरुणाचे नाव असून तो पदवीधर आणि बेरोजगार होता. आपल्या सुसाईड नोटमध्ये “हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळाले पाहिजे” अशी मागणी करून त्याने राहत्या घरी गळफास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन चव्हाण हा नाईक नगर परिसरात राहत होता. शनिवारी सकाळी अकरा वाजता त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीच तो जिंतूर येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बंजारा आरक्षण आंदोलनात सहभागी झाला होता. शुक्रवारी रात्री तो घरी परतला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आंदोलनासाठी जाण्याची तयारी करत असतानाच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे प्रयत्न, चंद्रपुरात लवकरच गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असता पवनच्या खिशात सुसाईड नोट मिळाली. त्यात बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण द्यावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती. पवन हा लातूरमधील शाहू कॉलेजचा बी.कॉम पदवीधर असून त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
Rane Vs Thackeray : ऑपरेशन सिंदूरवेळी हे लंडनच्या बारमध्ये बसले होते, दाखवू का?
दरम्यान, सरकारच्या २ सप्टेंबरच्या जीआरनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावे, या मागणीसाठी १५ सप्टेंबर रोजी जालन्यात बंजारा कृती समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात शनिवारी जालन्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मूळ टक्केवारीतच बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकवला जाणार आहे.
Maratha reservation : मराठा समाज कोणत्या प्रवर्गात? संचेतींचा दावा मराठे मागास नाहीत
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्यात आलेला आहे. याचाच आधार घेत समाजाकडून आरक्षणाची मागणी सातत्याने होत आहे. मात्र या मागणीला अद्याप सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आंदोलनं तीव्र झाली असून एका तरुणाने आत्महत्या केल्याने या प्रश्नावर नव्याने खळबळ उडाली आहे.
_____








