व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण दुष्काळाचा सहकार क्षेत्रालाही फटका; यवतमाळातील ८८ संस्थांच्या निवडणुका स्थगित

दुष्काळाचा सहकार क्षेत्रालाही फटका; यवतमाळातील ८८ संस्थांच्या निवडणुका स्थगित

शासनाचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल; इच्छुक उमेदवारांचा हिरमोड, सहकार क्षेत्रात नाराजी

Yavatmal : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम आता सहकार क्षेत्रातील निवडणुकांवरही झाला आहे. जिल्ह्यातील ८८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासनाचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयात प्राप्त झाल्याने निवडणुकीच्या तयारीत असलेल्या संस्थांना आणि इच्छुक उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. दुष्काळ निवारण आणि मदतकार्याला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील तरतुदींनुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत घेतल्या जातात. मात्र, यंदा राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.

गडचिरोलीत ‘वन विशेष आर्थिक क्षेत्र’ उभारण्याची शेकापची मागणी

राज्यातील २६५ तालुक्यांचा ट्रिगर-१, तर ३०४ तालुक्यांचा ट्रिगर-२ मध्ये समावेश करण्यात आला आहे. या भागांत दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि जलसंधारण यांसह विविध विभागांवर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे.

अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू ठेवल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वेळ निवडणूक प्रक्रियेत खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणाच्या कामांवर परिणाम होऊ नये, तसेच बाधित शेतकरी आणि सभासदांना सध्याच्या परिस्थितीत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यातील अडचणी लक्षात घेऊन स्थगितीचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व सहकारी संस्थांना ही स्थगिती सरसकट लागू नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक घेणे आवश्यक असलेल्या संस्था, नामनिर्देशनाच्या टप्प्यावर असलेल्या संस्था तसेच गृहनिर्माण संस्थांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. इतर संबंधित सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील काही प्रमुख पतसंस्थांसह विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होण्याची अपेक्षा होती. या निवडणुकांच्या माध्यमातून संस्थांचे नेतृत्व मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. मात्र, अचानक स्थगिती लागू झाल्याने त्यांच्या राजकीय आणि संस्थात्मक गणितांवर परिणाम झाला आहे.

पुन्हा अभिजित वंजारीच ‘पदवीधर’! भाजपला मोठा धक्का

निवडणुका पुढे ढकलल्यामुळे सहकार क्षेत्रातील काही नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता शासनाकडून पुढील आदेश कधी जारी होतात आणि निवडणूक प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होते, याकडे संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!