व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र पुन्हा अभिजित वंजारीच ‘पदवीधर’! भाजपला मोठा धक्का

पुन्हा अभिजित वंजारीच ‘पदवीधर’! भाजपला मोठा धक्का

कराळे गुरुजींच्या ‘दुसऱ्या पसंती’ने फिरवला निकाल

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या हायव्होल्टेज निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी भाजपच्या तोंडचा घास पळवत अक्षरशः दणदणीत विजय खेचून आणला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांच्या पारड्यात पडलेली दुसऱ्या पसंतीची मतेच वंजारी यांच्या विजयात निर्णायक ठरली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव झाल्याने भाजपला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. निकालाची अंतिम आकडेवारी मात्र अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

गंगाधरराव फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिनिधित्व केलेला हा मतदारसंघ भाजपचा ६० वर्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील निवडणुकीतही भाजपने तत्कालीन आमदार अनिल सोले यांना डावलल्याने पक्षाला पहिल्यांदाच या जागेवरून हात धुवावे लागले होते. यंदा सोले यांना उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर केली जाईल अशी शक्यता होती, मात्र सुधाकर कोहळे यांना आधीच शब्द दिल्याने पक्षनेतृत्वाचा नाईलाज झाला. कोहळे यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये अंतर्गत प्रचंड नाराजी पसरली. अनिल सोले यांनी जाहीरपणे बंडाचे निशान उभारल्यानंतर मुख्यमंत्र्यांना स्वतः त्यांच्या घरी जाऊन समजूत काढावी लागली होती; तरीही कार्यकर्त्यांमधील असंतोष शेवटपर्यंत कायम राहिल्याचे या निकालाने स्पष्ट केले आहे.

शिक्षकांनी माझी किंमत दाखवून दिली; संगीता शिंदे यांच्या पोस्टची चर्चा

गमावलेला बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दोन दिवस नागपुरात मुक्काम ठोकून शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक संस्थांच्या बैठकांचा धडाका लावला होता. मतदानाचा टक्का वाढल्याने भाजप नेत्यांचा उत्साह वाढला होता आणि पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच जिंकू असा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाल्यावर हे दावे फोल ठरले.

महायुतीचे किरण सरनाईक विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव

सुमारे ८० हजारांच्या पहिल्या पसंतीच्या मोजणीत भाजप माघारली होती, परंतु उर्वरित मतांमध्ये कोहळे यांनी सुमारे चार हजारांची आघाडी घेत पुनरागमन केले. पहिल्या पसंतीचा विजयाचा कोटा कोणालाही पूर्ण करता न आल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली. सुमारे ३० उमेदवार बाद झाल्यानंतर कोहळे यांची आघाडी ५ हजारांवर पोहोचली होती. मात्र, सर्वाधिक मते घेणाऱ्या शेवटच्या तीन उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होताच भाजपला लागोपाठ धक्के बसू लागले आणि कोहळे यांची आघाडी अवघ्या बाराशे मतांवर आली. त्यावेळी रिंगणातून बाद झालेल्या नितेश कराळे यांची तब्बल १४ हजार मते मोजली जाणे बाकी होते.

कराळे गुरुजींना मानणाऱ्या मतदारांनी दुसऱ्या पसंतीसाठी काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना एकतर्फी कौल दिल्याने वंजारी यांनी कोहळे यांची आघाडी मोडून काढत विजय आपल्या नावे केला. स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून लादलेली उमेदवारी पक्षाला किती महाग पडू शकते, याचा वस्तुपाठच या निकालाने भाजपला घालून दिला आहे.

 

error: Content is protected !!