दुसऱ्या पसंतीच्या मतांनी सरनाईकांचा विजय सुकर; काँग्रेसची विक्रमी मतांची कमाई
Akola अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत तुल्यबळ लढतीत दुसऱ्या पसंतीच्या मतांनी निर्णायक भूमिका बजावली. भाजपच्या साथीने शिवसेना शिंदे गटाचे वाशीम येथील विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी विजय मिळविला. विजयी होण्यासाठी आवश्यक असलेला १६ हजार १३४ मतांचा कोटा पूर्ण करत सरनाईक यांनी १६ हजार ६६३ मते मिळविली. दुसरीकडे, काँग्रेसच्या अकोल्यातील उमेदवार अदिती ऋषिकेश पोहरे यांनी ८ हजार ६३६ मते मिळविली. मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेससाठी ही विक्रमी मतसंख्या ठरली आहे.
विनाअनुदानित शाळा आणि कॉन्व्हेंटमधील शिक्षकांशी वर्षभरापासून ठेवलेला संपर्क, संस्थाचालकांशी साधलेला समन्वय, प्रचारासाठी केलेले नियोजन आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांवर दिलेला भर यामुळे सरनाईक यांचा विजय सुकर झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या निकालातून शिक्षक संघटनांच्या तुलनेत राजकीय पक्षांचे उमेदवार वरचढ ठरल्याचेही दिसून आले. पहिल्या तीन क्रमांकांवर राजकीय पक्षांचे उमेदवार राहिले.
काँग्रेसला विक्रमी मते; मात्र नियोजनात उशीर
काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उशिरा जाहीर केल्याने प्रचारासाठी अवघा एक महिन्याचा कालावधी मिळाला. निवडणूक केवळ विचारधारेच्या आधारावर लढता येत नाही, तर प्रभावी नियोजन आणि आर्थिक रसदही महत्त्वाची ठरते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. काँग्रेसला अल्पसंख्याक मतांचा मोठा पाठिंबा मिळाला; मात्र ही मते अन्य उमेदवारांकडेही विभागली गेली. त्यामुळे मतांचे एकत्रीकरण करण्यात पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.
समृद्धी महामार्गावरील आंदोलनावर पोलिसांची नोटीस; उद्धवसेना भूमिकेवर ठाम!
काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये शिक्षकांपेक्षा राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती अधिक असल्याचेही जाणकारांचे निरीक्षण आहे. अदिती पोहरे या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आहेत. त्यांना संस्थेतील शिक्षकांची मते मिळाली; मात्र ती एकगठ्ठा न मिळता विभागली गेल्याचे चित्र निकालातून दिसले.
२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ १ हजार ६ मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदा मिळालेली ८ हजार ६३६ मते ही पक्षासाठी महत्त्वाची ठरली. निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटल्याचेही दिसून आले.
शिंदेसेनेचे वर्षभरापासून नियोजन
किरण सरनाईक आणि त्यांच्या समर्थकांनी विनाअनुदानित शाळा व कॉन्व्हेंटमधील शिक्षकांशी वर्षभरापासून संपर्क ठेवला होता. या शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी करण्यापासून ते मतदानापर्यंत संपर्क कायम राहील, याची काळजी घेण्यात आली. शैक्षणिक संस्थांच्या संचालकांशीही समन्वय साधण्यात आला.
केवळ पहिल्या पसंतीच्या मतांवर अवलंबून न राहता ज्या जिल्ह्यांत किंवा तालुक्यांत पहिल्या पसंतीची मते मिळण्याची शक्यता कमी होती, तेथे दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी आग्रह धरण्यात आला. हे नियोजन विजयात निर्णायक ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
जुनी पेन्शन योजना आणि टप्पा अनुदान यांसारखे प्रश्न शिक्षक संघटनांऐवजी राजकीय पक्षांच्या माध्यमातूनच सुटू शकतात, अशी भावना शिक्षकांमध्ये वाढत असल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मिळालेल्या यशाकडे पाहिले जात आहे.
गडचिरोलीत ‘वन विशेष आर्थिक क्षेत्र’ उभारण्याची शेकापची मागणी
भाजपकडून आगामी निवडणुकीची पेरणी?
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने युतीधर्म पाळल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राजकीय पेरणी केल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
वाशीम जिल्ह्यात किरण सरनाईक यांची वाढलेली ताकद अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड विधानसभा क्षेत्रात भाजपसाठी उपयुक्त ठरू शकते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सुमारे ४० हजार ६०० मतांचेच मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या विजयाचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले जात आहे.
राज्यातील अन्य ठिकाणी युतीतील घटक पक्षांमध्ये दगाफटका होऊ नये, यासाठी भाजपच्या नेतृत्वाने शिक्षक मतदारसंघात शिंदेसेनेच्या उमेदवाराला मदत करण्याचे निर्देश दिल्याची चर्चा आहे. त्यानुसार भाजपने सरनाईक यांना साथ दिली.
अकोल्यातूनही तगडे आव्हान
या निवडणुकीत अकोला जिल्ह्यातून काँग्रेसच्या अदिती पोहरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रा. संतोष हुशे, विज्युक्टाचे प्रा. अविनाश बोर्डे, राजकुमार कड आणि श्रीकृष्ण पहुरकर हे उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातून तुल्यबळ आव्हान उभे राहिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये झालेल्या बंडखोरीचा निकालावर मोठा परिणाम झाला नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. एकीकडे भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदेसेनेला विजय मिळाला, तर दुसरीकडे काँग्रेसनेही विक्रमी मतसंख्या मिळवत आपली राजकीय ताकद दाखवून दिली.








