व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Farmers anger : हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचा रोष उफाळला !

Farmers anger : हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचा रोष उफाळला !

Agriculture Minister bombarded with questions, anger over Panchnamas : कृषिमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार, पंचनाम्यांवरून संताप

Jalna: अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचा रोष बुधवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर उफाळून आला. बदनापूर तालुक्यातील गेवराई गावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भरणेंना शेतकऱ्यांनी अक्षरशः घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. “पंधरा दिवस झाले पाण्यातच बसलोय, जनावरांना खायला काही नाही, सरकारने आम्हाला दिलं तरी काय?” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी भिजून कुजलेली पिकं थेट कृषीमंत्र्यांच्या हातात देत यंत्रणेवर तीव्र टीका केली. “जिल्हाधिकारी मॅडमनी फळबागांचे पंचनामे करू नका, असे आदेश दिले आहेत. अधिकारी शेतकऱ्यांना विचारायलाही येत नाहीत,” असा आरोप करत शेतकऱ्यांनी यंत्रणेची लाज काढली. या संतप्त वातावरणात काही काळ कृषीमंत्र्यांना गाव सोडण्याची वेळ येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

Local body election : निवडणूक खर्च मर्यादा ९ वर्षांपासून आहे तेवढीच !

दरम्यान, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना फोनवर फैलावर घेत “ज्याचं नुकसान झालं त्याचं सगळं नुकसान नोंदवा. शेतकऱ्याचा एकही गुंठा पंचनामा राहिला तर जबाबदार तुम्ही असाल. शेतकरी वंचित राहणार नाही, ही माझी जबाबदारी आहे,” असे स्पष्ट शब्दांत बजावले.

यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना भरणे म्हणाले, “मी तुमच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी इथे आलो आहे. एक-दोन ठिकाणी गेलो तरी यंत्रणा संपूर्ण तालुक्यात सक्रिय होईल. तुमचा रोष साहजिक आहे कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. पण आता कोणताही पंचनामा राहणार नाही. मेंढ्या, गुरं वाहून गेली असतील किंवा घरांची पडझड झाली असेल, तर त्याची नुकसानभरपाई दिली जाईल.”

RPI Ramdas Athavle : रिपाइं (आठवले)च्या बैठकीत खुर्च्या, कुंड्या फेकून मारल्या!

भरणे यांनी पुढे आश्वासन दिले की, “ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महसूल आणि कृषी विभाग यासाठी प्रयत्न करत आहेत. जमीन वाहून गेली असेल, विहिरी बुजल्या असतील किंवा घरांचे नुकसान झाले असेल, तर त्याची नुकसानभरपाई तुम्हाला दिली जाईल. काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे.”

शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन आणि सरकारी यंत्रणांना धडा मिळाल्याचे चित्र जालन्यात पाहायला मिळाले.

error: Content is protected !!