Finally, the suspension of the Joint Deputy Registrar : अखेर सह-दुय्यम निबंधकाचे निलंबन
Nagpur : राज्यातील निबंधक कार्यालयांतील भ्रष्टाचारावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नागपूरच्या खामला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक धाड टाकली होती. या धाडीत एका अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमधून रोख स्वरूपात 5 हजार रुपये आढळून आले होते. या घटनेने प्रशासनातच खळबळ उडाली होती. आता महसूलमंत्र्यांनी थेट कारवाई करत संबंधित सह-दुय्यम निबंधक अ.तु. कपाले यांना निलंबित केल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी ही कारवाई स्वतःच्या उपस्थितीत केली. खामला निबंधक कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी कार्यालयातील रेकॉर्ड, व्यवहार आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची पाहणी केली. याच दरम्यान एका अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमधून 5 हजार रुपयांची रोकड सापडली. ही रोकड पाहताच बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्याला चौकशीस सामोरे जाण्याचे आदेश दिले.
Parab Vs kadam : योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी अनिल परब आग्रही !
महत्वाचे म्हणजे, ही धाड पूर्णपणे अनपेक्षित होती आणि यावेळी पत्रकार आणि कॅमेरे देखील उपस्थित होते. त्यामुळे या घटनेचे चित्रण थेट प्रसारित झाल्याने हा भ्रष्टाचार उघडपणे समोर आला. बावनकुळे म्हणाले, “या कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. अनेकांनी पैशांची मागणी होत असल्याचे सांगितले. त्यामुळे स्वतःच आलो आणि सत्य समोर आलं.”
धाडीनंतर महसूलमंत्र्यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, सह-दुय्यम निबंधक अ.तु. कपाले यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने जारी करण्यात आले आहेत.
Andhare Vs kadam : योगेश कदमांकडून गुंडाला अभय सुषमा अंधारेंकडून पोलखोल
निलंबन आदेशानुसार, कपाले यांचे मुख्यालय अमरावती येथे निश्चित करण्यात आले आहे. ते नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, अमरावती विभाग, अमरावती यांच्या नियंत्रणाखाली राहतील. तसेच सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील निबंधक कार्यालयांतील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने तक्रारी येत असताना, महसूलमंत्र्यांनी केलेल्या या थेट कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे. बावनकुळे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, “प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संरक्षण मिळेल; पण नागरिकांना लुटणाऱ्यांना थेट शिक्षा भोगावी लागेल.”
या धाडीनंतर आता इतर जिल्ह्यांतील निबंधक कार्यालयांतही सतर्कतेची भावना निर्माण झाली असून, महसूल विभागाने अंतर्गत चौकशी मोहीमही सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
____








