Mahavikas Aghadi to meet Election Commission again : महाविकास आघाडी पुन्हा निवडणूक आयोगाच्या भेटीला
Mumbai : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधक निवडणूक आयोगाविरोधात एकत्र आले आहेत. महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आज बुधवारी पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. काल मंगळवारी विरोधी पक्षांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. मात्र, त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आज पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले आणि प्रकाश रेड्डी यांसारखे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. चर्चेनंतर महाविकास आघाडी, मनसे आणि इतर पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.
Local Body Elections : सभापतीपद एसटीसाठी राखीव, पण सदस्यांमध्ये एकही एसटी जागा नाही!
विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारींमध्ये दुबार मतदान, मतदार यादीतील घोळ आणि पारदर्शकतेचा अभाव हे प्रमुख मुद्दे आहेत. मतदार याद्यांतील त्रुटींमुळे लोकशाही प्रक्रियेवर जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. आयोगाच्या कारभाराबाबत सर्वसामान्यांमध्ये शंका निर्माण झाल्या असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
विरोधकांनी आयोगाकडे मागणी केली की, निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, मतदार याद्या पारदर्शकपणे प्रसिद्ध कराव्यात आणि नागरिकांना त्यांच्या नावांविषयी संपूर्ण माहिती मिळावी. मतदारांची नावे काढली गेली असतील तर त्याचे कारण संबंधितांना लेखी स्वरूपात देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी बैठकीत आयोगावर सरळ सवालांचा भडिमार केला. “निवडणुका लागलेल्या नाहीत, तरी मतदान नोंदणी बंद का केली?” असा प्रश्न त्यांनी विचारला. “आज 18 वर्षे पूर्ण करणारे युवक मतदान करू नयेत का?” असा सवाल करत त्यांनी मतदार यादीतील गोंधळावर ताशेरे ओढले. “दोन-दोन ठिकाणी मतदारांचे नाव आहे, वडिलांचं वय मुलापेक्षा कमी दाखवलं गेलंय. एवढा गोंधळ असूनही तुम्ही निवडणुकीला कसे सामोरे जाणार?” असा प्रश्नही त्यांनी आयोगाला विचारला. तसेच, “31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश आहेत, तुम्ही सज्ज आहात का?” अशी थेट विचारणा करत व्हिव्हिपॅट मशीनचा वापर करण्याची मागणी त्यांनी केली.
Chandrashekhar Bawankule : धाड आणि धामणगाव बढे होणार नवे स्वतंत्र तालुके?
यावर प्रतिक्रिया देताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, विधानसभा मतदारसंघाच्या यादीत नावे समाविष्ट करणे, वगळणे किंवा बदल करणे हा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी यादी ही विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीवर आधारित असते आणि त्यावरील सुधारणा करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. आजच्या बैठकीतून आयोग आणि विरोधक यांच्यात काय निर्णय निघतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








