NCP warns of strong protests over Congress’s objectionable “Gungi Gudiya” remark against Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा
Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या आक्षेपार्ह उल्लेखावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आंदोलनाची हाक दिली असून, दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. या वादात काँग्रेसने जुना संदर्भ देत इंदिरा गांधी यांना याच शब्दाने हिणवणाऱ्या भाजपलाही या प्रकरणात ओढले आहे.
काँग्रेसच्या या अशोभनीय ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी सडेतोड उत्तर देत काँग्रेसच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीत विरोधकांकडून अशाच प्रकारची टीका केली गेली होती. मात्र, इंदिरा गांधी यांनी कोणालाही शब्दांनी नव्हे तर बांगलादेश मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांतून आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिले होते, याची आठवण पाटील यांनी करून दिली.
ज्या शब्दप्रयोगाला काँग्रेसने भूतकाळात अन्यायकारक आणि महिलेचा अवमान करणारी टीका मानले होते, आज त्याच भाषेचा वापर काँग्रेस स्वतः एका महिला लोकप्रतिनिधीविरुद्ध करत आहे. याचा अर्थ काँग्रेस अप्रत्यक्षपणे त्या टीकेचे समर्थन करत आहे का? असा संतप्त सवाल उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न केवळ एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून सार्वजनिक जीवनातील महिलांविषयीच्या राजकीय संस्कृतीचा आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात आणि धोरणांवर कठोर टीकाही करता येते, परंतु महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही राजकीय पक्षाला शोभणारी नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला खडसावले आहे. या वादानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.








