Sushma Andhares direct attack; Serious allegations against Tushar Doshi, Chakankar : सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल; तुषार दोशी, चाकणकरांवर गंभीर आरोप
Paltan : फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे पुन्हा आक्रमक अवतारात दिसल्या. त्यांनी या प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर थेट आरोप केले. “मृत महिलेचे चारित्र्यहनन करणाऱ्यांना पोलीस वाचवत आहेत,” असा दावा करत अंधारेंनी संपूर्ण पोलिस यंत्रणेवरच हल्लाबोल केला.
फलटण पोलीस ठाण्यासमोर सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. या वेळी अंधारेंनी पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त करत म्हटलं, “फलटण पोलीस ठाणं आता छळछावणी बनलं आहे. माझा आक्षेप थेट पोलीस अधीक्षक तुषार दोशींवर आहे. त्यांनी जाणूनबुजून मृत डॉक्टरचं चारित्र्यहनन केलं. माहिती जाहीर करता येत नाही असं सांगणारे पोलीस, पण चॅट माध्यमात कसं आलं? रुपाली चाकणकरांनी ते कसं उघड केलं आणि तुषार दोशींनी त्यांना थांबवलं नाही?” असा सवाल अंधारेंनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, “तुषार दोशी हे नावाप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी त्या डॉक्टरच्या सन्मानाचं रक्षण न करता उलट तिचं ठरवून चारित्र्यहनन केलं.”
सुषमा अंधारे यांनी राज्याचे मंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनाही लक्ष्य केलं. “जयकुमार गोरे कोण तीस मार खान? आधी स्वतःचं चारित्र्य बघावं! चाकणकर बाई चारित्र्य ठरवणार का? त्यांनी आधी स्वतःच तपासावं. तपासातील गोष्ट जर अधिकारी सांगू शकत नाही, तर चाकणकरांनी ती कशी काय उघड केली?” असा रोखठोक सवाल अंधारेंनी केला.
त्यांनी पुढे म्हटलं, “या प्रकरणात सरकार आणि पोलिस प्रशासन मृत महिलेचा अपमान करत आहे. तिच्या सन्मानासाठीच आम्ही हा लढा देत आहोत. हा पक्षीय नाही, मानवी प्रश्न आहे.”
Asam Sarode : अॅडव्होकेट असीम सरोदेंना बार कौन्सिलचा मोठा झटका!
सुषमा अंधारे यांनी या प्रकरणातील सहा संशयितांची नावे घेत त्यांच्या चौकशीची मागणी केली. “डीवायएसपी राहुल धस, एपीआय जायपात्रे, माजी खासदारांचे दोन पीए शिंदे आणि नागटिळक, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ यांच्यावर आरोप आहेत. मग या लोकांवर आरोपपत्र दाखल का केलं नाही? डिपार्टमेंट त्यांना वाचवतंय का?” असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.
या प्रकरणात आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, “ही खरी एसआयटी नसून फक्त तपासावर देखरेखीची जबाबदारी दिली आहे,” असा दावा अंधारेंनी केला. त्यांनी पुढे मागणी केली की, या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
Doctor suicide case : “डॉ. संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर वैद्यकीय क्षेत्रात संताप !
शेवटी सुषमा अंधारे म्हणाल्या, “हा लढा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा नाही. एका निष्पाप मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. तिच्यावर झालेला अन्याय महाराष्ट्र विसरणार नाही.”
या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. पोलिस तपासावर आणि नेत्यांच्या वक्तव्यांवरून आता सरकारलाही अडचणीत आणणारा नवा वाद उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
_______








