No-confidence motion by 12 directors against the chairperson : सभापती सुभाष पेसोडे यांच्याविरोधात १२ संचालकांचा अविश्वास ठराव दाखल
Khamgao राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईचे केंद्र बनलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्याविरोधात अखेर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. समितीतील १८ पैकी तब्बल १२ संचालकांनी ठरावावर सह्या करून पेसोडे यांच्या नेतृत्वावरील नाराजी स्पष्ट केली आहे.
खामगाव कृउबासवर गेल्या दोन वर्षांपूर्वी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखालील गटाने एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी सभापती सुभाष पेसोडेसह पाच संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. या निर्णयानंतर कृउबासमधील राजकीय समीकरणात मोठे बदल घडले आणि सत्ताधारी गटात फूट पडली.
Local Body Elections : मतदारयादीचा टप्पा पूर्ण; जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीची उलटी गणती सुरू!
अविश्वास ठरावात पेसोडे यांच्यावर प्रशासनावर नियंत्रण नसल्याचा, दैनंदिन कामकाजात समन्वय अभाव असल्याचा तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील संवाद तुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचीही ठळक तक्रार ठरावात नमूद करण्यात आली आहे.
हा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे अशोक हटकर यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आला असून, त्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ६, भारिप बहुजन महासंघाचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे २ आणि भाजपचा १ असा संचालकांचा पाठिंबा आहे.
Local Body Elections : शिवसेनेची तयारी जोरात, मेहकरमध्ये ‘शिवसंकल्प’!
अविश्वास ठरावावर सही करणाऱ्यांमध्ये राजाराम काळणे, विनोद टिकार, गणेश माने, श्रीकृष्ण टिकार, अशोक हटकर, वैशाली मुजुंगले, मंगेश इंगळे, संघपाल जाधव, शांताराम पाटेखेडे, राजेश हेलोडे, सौ. सुलोचना वानखडे आणि सचिन वानखडे या संचालकांचा समावेश आहे.
खामगाव कृउबासमधील ही घडामोड जिल्ह्याच्या राजकारणात नव्या सत्तासमीकरणांची चाहूल देणारी ठरत असून, आगामी काळात या ठरावावर होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








