Neelam Gorhes statement sparks new controversy in the Mahayuti? : नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत नवा वाद?
Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अलीकडेच अजित पवार पुढील आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय पूजा करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. गोऱ्हे म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. महिलांना राजकारणात स्थान मिळाले असले तरी त्यांच्या सुरक्षेचे आणि सक्षमीकरणाचे काम अजून बाकी आहे. महिलांना आरक्षण मिळाले, पण संरक्षण नाही. त्यासाठीचा संघर्ष अजूनही सुरू आहे.”
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला जामीन मंजूर !
नीलम गोऱ्हे यांच्या या विधानामुळे राजकीय पातळीवर नवे समीकरण चर्चेत आले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना ‘लाडकी बहीण’ ही योजना सुरु करण्यात आली आणि ती अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी सुरु केलेल्या या योजनेमुळे शिंदे यांची प्रतिमा मजबूत झाली होती. शिवसेनेकडून या योजनेचा प्रचार करताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा वापर एकनाथ शिंदे यांच्या जनमानसातील प्रतिमा निर्मितीसाठी करण्यात आला होता.
त्याच पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांना “महिलांच्या मनातील मुख्यमंत्री” असे संबोधल्याने आता महायुतीत नव्या चर्चांना उधाण आले आहे. हे वक्तव्य निवडणुकीपूर्वी जाणूनबुजून करण्यात आले का, किंवा हे केवळ महिलांच्या सक्षमीकरणाविषयीचा गौरवोद्गार होता, याबाबत राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी म्हटलं की, “हे पुस्तक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करणारे आहे. हे केवळ महिलांसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहे. महिलांच्या समस्यांकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहायला लावणारे हे पुस्तक आहे.”
MSEDCL Tariff Hike : वीज दरवाढीचा निर्णय रद्द, महानिर्मिती व महावितरणला मोठा धक्का !
नीलम गोऱ्हे यांच्या या विधानानंतर आता महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणांवर नवा वाद निर्माण होणार का, आणि या वक्तव्याला भाजपकडून काय प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








