Dipesh Mhatre and Shivaji Sawant join BJP : दीपेश म्हात्रे आणि शिवाजी सावंत भाजपात
Mumbai : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने महत्त्वाचा राजकीय डाव साधत एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही धक्का दिला आहे. ठाकरेंच्या पक्षातील कल्याण-डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आणि शिंदे गटाचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत या दोघांनीही भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर या घडामोडींचा थेट परिणाम होणार असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
दीपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळत असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे भाजपात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. म्हात्रे हे उद्धव ठाकरे गटाकडून डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहिले होते, तसेच जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Centenary of RSS : हिंदू असणं म्हणजे भारतासाठी जबाबदार असणं !
वयाच्या केवळ २३ व्या वर्षी राजकारणात दाखल झालेल्या म्हात्रे यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. २००९ साली पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर सलग तीन वेळा महापालिकेत निवडून येत स्थायी समिती सभापतीपदापर्यंत मजल मारली. २०१४ आणि २०२४ मध्ये त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काही काळ ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहिले; मात्र नंतर पुन्हा उद्धव ठाकरे गटात परतले. आता भाजपात जाण्याच्या त्यांच्या निर्णयाने उद्धवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, काँग्रेसलाही भाजपाने कल्याणमध्ये धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सचिव संतोष केणे हेही भाजपात प्रवेश करत आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात सक्रिय असलेले केणे हे स्थानिक प्रश्नांवर नेहमी आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. नवी मुंबई विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ नाव देण्याच्या मागणीसाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली होती.
राजकीय हालचाली फक्त कल्याणपुरत्याच मर्यादित नसून सोलापूर जिल्ह्यातही भाजपाने शिंदे गटाला मोठा झटका दिला आहे. शिंदेसेनेचे माजी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हेही १२ नोव्हेंबरला मुंबईत भाजपात प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात शिंदेसेनेचे अनेक स्थानिक पदाधिकारीही भाजपात दाखल होतील, असा दावा सावंत यांनी केला आहे.
Mahayuti in Nagpur : उपराजधानीत शिंदेसेना–राष्ट्रवादीची स्वतंत्र तयारी !
या प्रवेशामुळे भाजपाने स्थानिक पातळीवर आपला संघटनात्मक पाया अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. महायुतीतील तणावग्रस्त संबंध आणि पुढील महापालिका निवडणुकांपूर्वी भाजप स्वतःचं स्वतंत्र राजकीय बळ उभारण्याच्या तयारीत असल्याचे या घटनाक्रमातून स्पष्ट होत आहे.








