Nomination Filing Process for Elections Begins Today : काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमान, प्रहारचे उमेदवार निश्चित; भाजपच्या मुलाखती सुरू
Amravati जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज, सोमवार, दि. १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. निवडणुकीसाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. काँग्रेस, प्रहार, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट) आणि युवा स्वाभिमान पक्षाने उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण करून बहुतेक ठिकाणी उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.
भाजपने शनिवारी येथील पक्ष मुख्यालयात निवडणूक प्रमुख खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत मोर्शी, वरुड व शेंदुरजना घाट या नगरपालिकांतील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मेळघाटसह अचलपूर–परतवाडा आणि अंजनगाव सुर्जी येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मेळावे घेण्यात आले. रविवारी आणखी तीन नगरपालिकांसाठी अमरावतीत मुलाखती होणार असून, उमेदवारांची अंतिम निश्चिती केली जाईल.
Sudhir Mungantiwar : कळमना येथे साकारले आधुनिक ‘स्मार्ट’ प्राथमिक आरोग्य केंद्र !
काँग्रेसने जिल्हा पातळीवर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर आणि खा. बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत गेल्या दोन दिवसांत या मुलाखती पूर्ण झाल्या. नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली.
आ. रवी राणा यांच्या नेतृत्वाखालील युवा स्वाभिमान पक्षानेही निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. सुनील राणा यांच्या उपस्थितीत जिल्हाभरातील कार्यकर्त्यांच्या सभा व बैठका घेण्यात आल्या. या बैठकीतच नगरपालिकानिहाय उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षानेही उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात नेली आहे. “शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनामुळे थोडे लक्ष विचलित झाले, परंतु दोन-तीन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल,” असे बच्चू कडू यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची निश्चिती मुंबईतील बैठकीत केली आहे. निवडणूक प्रमुख आ. संजय खोडके यांनी माहिती देताना सांगितले की, “तीन दिवस चाललेल्या बैठकीनंतर सर्व नगरपालिकांमधील उमेदवार निश्चित करण्यात आले असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल.”
शिवसेना उबाठा पक्षाचा मेळावा रविवारी हॉटेल महफिल इन (कॅम्प) येथे होणार आहे. या मेळाव्यात संपर्कप्रमुख अरविंद सावंत आणि आ. नितीन देशमुख उपस्थित राहणार आहेत. मुलाखतीनंतर उमेदवारांची अंतिम निश्चिती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख पराग गुडधे यांनी दिली.








