Thakur’s power increased after joining BJP, while the Deshmukh group is under pressure after Salil Deshmukh’s defeat : भाजपमध्ये आल्यानं ठाकुरांची ताकद वाढली तर सलील देशमुख यांच्या पराभवानंतर देशमुख गट दबावात
Nagpur : काटोल विधानसभा मतदारसंघातील राजकारण नगरपरिषदेच्या निवडणुकीl पुन्हा तापणार आहे. जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेचा हॉट नगरपरिषदांमध्ये समावेश होतो. येथे आमदार चरणसिंग ठाकूर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा जुना संघर्ष यंदा नव्या वळणावर पोहोचला आहे. ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता लढाई थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अशी होणार आहे.
काटोल तालुक्यातील राजकारणात ठाकूर आणि देशमुख गटातील टक्कर अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे काटोल नागरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकूर गटाचे वर्चस्व राहिले आहे. चरणसिंग ठाकूर स्वतः दीर्घकाळ नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे स्थानिक सत्तारचनेत त्यांचा प्रभाव कायम आहे. अनिल देशमुख यांचे वर्चस्व नरखेड व मोवाड नगरपरिषदांवर राहिलेले आहे. काटोल शहरांमध्ये ते फारसे लक्ष घालत नव्हते. त्यामुळे या विषयात देशमुख आणि ठाकूर यांची छुपी युती तर नाही ना, असाही प्रश्न राजकारण चर्चिला गेला.
Local Body Elections : ‘मतचोरी’चा स्फोटक मुद्दा महाविकास आघाडीला फायदा करून देणार ?
यावेळी काटोल विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधिक मोठी आणि गुंतागुंतीची झाली आहेत. काटोल, मोवाड आणि नरखेड या पारंपरिक तीन नगरपरिषदांसोबत यंदा कोंढाळी या नगर परिषदेची भर पडली आहे. या चार नगरपरिषदांमध्ये दोन्ही गट प्रतिष्ठेची लढाई लढणार आहेत. नरखेड आणि मोवाड हे अनिल देशमुख यांचे अनेक वर्षापासूनचे मजबूत गड म्हणून ओळखले जात होते. मात्र मागील निवडणुकीत नरखेडमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला. तेव्हा देशमुखांचा गड ढासळला होता. या पार्श्वभूमीवर देशमुख गटासमोरची आव्हाने आता अधिक कठीण बनत चालली आहेत.
यात भरीस भर म्हणजे अलीकडील विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा झालेला पराभव आणि या पराभवासाठी मत चोरीचे गंभीर आरोप देशमुखांनी केलेले आहेत. या धक्क्यातून गट सावरत असताना ठाकूर गटाची भाजपमधून मिळालेली राजकीय ताकद त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. ठाकूर यांचा आत्मविश्वास वाढलेला असून भाजपच्या संघटनेचा पाठिंबा मिळाल्याने ते चारही नगरपरिषदांवर कब्जा करण्यासाठी आक्रमक रणनीती आखत आहेत.
Dr. Mohan Bhagwat : भारताने जगाला विविधतेचे व्यवस्थापन शिकवावे !
गेल्या अनेक वर्षांच्या वर्चस्वाचा अनुभव स्थानिक जनाधार आणि कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क, यांमुळे ठाकूर गट आगामी निवडणुकांमध्ये तुलनेत ताकदवर मानला जात आहे. काटोल, मोवाड, नरखेड आणि कोंढाळी या चारही नगरपरिषदांच्या निवडणुका यंदा दोन राजकीय दिग्गजांच्या प्रतिष्ठा आणि अस्तित्वाच्या लढाईत रुपांतरीत झाल्या आहेत. कोण जिंकेल हे भविष्यात ठरेलच. पण काटोलचे निवडणूक रणांगण पुन्हा एकदा तापले आहे.








