devendra fadnavis alliance decision local body elections : स्थानिक निवडणुकांवर देवेंद्र फडणवीसांचा मोठा संकेत
Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महायुती होणार की पक्ष स्वतंत्रपणे लढणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान करत युतीबाबतचे चित्र पुढील दोन दिवसांत स्पष्ट होईल, असा संकेत दिला आहे. स्थानिक पातळीवर पक्षांमध्ये चर्चेला वेग आला असून अनेक जिल्ह्यांत निवडणूक समीकरणे तयार होत आहेत.
फडणवीस म्हणाले की, स्थानिक निवडणुका या जिल्हास्तरावरील छोट्या निवडणुका आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीनुसार युतीचे किंवा स्वतंत्र लढण्याचे निर्णय घेतले जात आहेत. काही जिल्ह्यांत दोन पक्षांची युती झाली आहे, तर काही ठिकाणी कोणत्याही पक्षांमध्ये युती नाही. जागावाटप ही राज्य-स्तरीय चर्चा नसून जिल्ह्यांमध्येच अंतिम केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेनंतर परवापर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
Electricity tariff reduction : 12% वीजदर कपात करण्याच्या निर्देशाला आव्हान !
महापालिका निवडणुकांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, मोठ्या शहरांच्या निवडणुकांमध्ये वेगळे निकष लागू होतात. महापालिका निवडणुका या मोठ्या स्तरावरील असल्याने शक्य तिथेच युती होणार आहे. काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीमुळे पक्ष स्वतंत्रपणेही लढू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या मराठवाडा कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या फडणवीसांच्या या दौऱ्याला स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर महत्त्व आले आहे. याच कार्यक्रमात काही कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
प्रफुल पटेल यांच्या राजकीय भूमिकेबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, त्यांचा रोख कोणाकडे आहे हे शोधून काढा, पण आमच्याकडे नाही हे नक्की आहे. राज्यातील सत्तासमीकरणांवर चर्चा सुरू असताना त्यांच्या या विधानाने नवी राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांचा भाजपातील प्रवेश आणि योगेश क्षीरसागर यांनी दिलेला राजीनामा हे संकेतही निवडणूक राजकारणात बदलांचे द्योतक म्हणून पाहिले जात आहेत.
Supriya Sule : पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात सुप्रिया सुळे यांचे थेट मुख्यमंत्र्यांकडे बोट !
फडणवीसांनी स्पष्ट केले की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्व पक्ष ताकदीने उतरले आहेत आणि स्थानिक परिस्थितीनुसारच युती किंवा स्वतंत्र लढण्याचे निर्णय अंतिम केले जातील. आगामी निवडणूक चित्रावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून पुढील दोन दिवसांत महत्त्वाचे राजकीय संकेत मिळण्याची शक्यता आहे.








