Local body election : ‘ऑपरेशन लोटस’ने शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली !

Tensions flare up after Amit Shah – Eknath Shinde meeting, claims from Saamna : सामनातून दावा, अमित शाह – एकनाथ शिंदे भेटीमागील तणाव उफाळला

Mumbai: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्या मुखपत्र सामना मधून दावा केला आहे की भारतीय जनता पक्षाने नव्या ‘ऑपरेशन लोटस’ अंतर्गत शिवसेना शिंदे गटातील तब्बल ३५ आमदारांना फोडण्याची मोठी तयारी सुरु केली आहे. या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने नवी दिल्ली येथे गेले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन तक्रार मांडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीत शाह यांनी शिंदेंची तक्रार गांभीर्याने न घेता उलट त्यांच्याच भूतकाळाची आठवण करून दिल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

गेल्या काही दिवसांत शिवसेना (शिंदे) व भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये तणाव वाढत चालला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) गटातील काही पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत, ज्यामुळे शिंदे यांनी वरिष्ठ भाजप नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या गटातील आमदारांनीही उघडपणे संताप व्यक्त केला आहे. या बदललेल्या वातावरणात शिंदे दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरुद्ध तक्रार केली. “हे दोघे आमचा पक्ष फोडत आहेत, आमचे लोक पैशाच्या जोरावर विकत घेत आहेत,” अशी तक्रार शिंदेंनी केल्याचे सामनाने लिहिले आहे. मात्र, या तक्रारीवर अमित शाह हसले आणि “तुमचा पक्ष हा आम्ही फोडला म्हणूनच तुम्हाला आज ‘पक्ष’ असल्याचा अधिकार मिळाला,” अशा रोखठोक शब्दांत शिंदेंना सुनावल्याचे मुखपत्राने म्हटले आहे.

Candidates car accident : शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारची भरधाव धडक

शहांनी शिंदेंना “क्रोनॉलॉजी” समजावून सांगताना, “पैसे वाटून माणसे फोडण्यात तुमचीच ख्याती. रवींद्र चव्हाण तेच करत असतील तर तुम्ही रागावण्याचे कारण नाही. मुंबईला जा, त्यांच्यासोबत चहा प्या आणि फालतू तक्रारी घेऊन दिल्लीत येऊ नका,” असे सुनावल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. शिंदे मात्र दिल्लीतून परतल्यावर “भेट यशस्वी झाली आणि शाह यांनी आपला सन्मान राखण्याचे आश्वासन दिले,” असे सांगत आहेत. सामनाने या वक्तव्याला केवळ “बतावणी” असे संबोधून टीका केली आहे.

Maratha Reservation : मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाचा सरकारचा निर्णय अयोग्य, मुंबई उच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद !

दरम्यान ठाण्यातील राजकीय वातावरणही तापलेले आहे. गुरुवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप समोर आला असून, “आमच्या विरोधात गेलात तर अशीच खबरदारी घेऊ,” असा इशारा दिल्याचे म्हटले जाते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाला मोठे खिंडार पाडले असून, शिंदेंनी पैशांच्या जोरावर जोडलेल्या अनेक ‘माणसांना’ चव्हाण यांनी ‘होलसेल’मध्ये आपल्याकडे घेतल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

Local Body Elections : कामठी–मौद्यात ‘महा-ट्युनिंग’चा खेळ ! बावनकुळे आणि अजित पवारांची जुळवाजुळव चर्चेत !

या सर्व घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री शिंदे नाराज दिसत आहेत, परंतु त्यांची नाराजी गांभीर्याने घेण्याची तयारी भाजपने दाखवलेली नाही. ‘वापरा, फेका किंवा गिळून फस्त करा’ हा भाजपचा स्वभाव असल्याचा आरोप सामनाने करून, शिंदे व त्यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांना आता त्यांच्या राजकीय वास्तवाची जाणीव होत असल्याची टीका करण्यात केली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना आलेला हा ‘ऑपरेशन लोटस’चा दावा, दिल्लीतील शिंदे–शाह भेटीतील कथित तणाव आणि ठाण्यातील संघर्ष यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध आणखी गुंतागुंतीचे होत असून महाराष्ट्राच्या राजकारणात तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

______