Local body election : अज्ञातस्थळी गेलेले राष्ट्रवादीचे सहा मुस्लिम उमेदवार परतले !

Sensational allegations of pressure from BJP derailed the election : भाजपकडून दबावाच्या सनसनाटी आरोपांनी निवडणूक ढवळून निघाली

Jamner : नगरपरिषद निवडणुकीत राजकीय नाट्य चांगलेच रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सहा मुस्लिम उमेदवारांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अचानक अज्ञातस्थळी रवाना झाल्याने मोठी खळबळ उडाली. उमेदवारांना सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर हे सहा उमेदवार जामनेरमध्ये परतल्याने या प्रकरणातील अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.

राष्ट्रवादीच्या जावेद मुल्ला यांनी आरोप केला आहे की जामनेर नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांवर प्रचंड दबाव आणला जात होता आणि मोठमोठी प्रलोभने देऊन अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले जात होते. ते म्हणाले की, “अर्ज माघारीच्या दिवशी मी पाच उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी नेले. आमच्यावर कोण दबाव टाकत आहे हे संपूर्ण जामनेरला माहिती आहे. मात्र, निवडणूक प्रक्रिया आटोपल्यावरच त्यांची नावे जाहीर करू.”

Local body election : ‘ऑपरेशन लोटस’ने शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली !

मुल्ला यांनी भाजपवर थेट आरोप करत सांगितले की, निवडणुकीत एकहाती विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. “जर मागील पाच वर्षांत तुम्ही खरंच विकासकामे केली असतील, तर इतर पक्षांचे उमेदवार मागे घेण्यासाठी एवढे प्रयत्न का करावे लागत आहेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

साधना महाजन यांच्या बिनविरोध निवडणुकीवरही त्यांनी टीका करत, “हा विजय नसून लोकशाहीची हत्या आहे,” असे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, आपण अज्ञातस्थळी असताना भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे फोन आले होते. परिस्थिती अनुकूल झाल्यावर त्यांच्या नावांचीही घोषणा केली जाईल.

Candidates car accident : शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारची भरधाव धडक

दरम्यान, माघारीची मुदत संपल्यानंतर जामनेरमधील निवडणुकीचे समीकरण स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 59 उमेदवार मैदानात राहिले असून, नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी साधना गिरीश महाजन बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग 1 मध्ये भाजपाचे दत्तात्रय जोहरे तिघा प्रतिस्पर्ध्यांविरोधात लढत देणार आहेत. प्रभाग 3 मध्ये भाजपाचे बाबुराव हिवराळे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात सरळ सामना रंगणार आहे. प्रभाग 9 मध्ये विद्यमान नगरसेवक आतिष झाल्टे यांच्याविरोधात त्यांचे सख्खे चुलत भाऊ संतोष झाल्टे रिंगणात आहेत.

जामनेरमध्ये भाजपाचे 9 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले असले तरी उर्वरित जागांवर चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत. अज्ञातस्थळी गेलेले उमेदवार परतल्याने संपूर्ण राजकीय तापमान आणखी वाढले असून, या सनसनाटी नाट्यानंतर निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.

______