Local body election : शरद पवार गटाच्या खासदारांच्या वक्तव्यामुळे खळबळ

Direct threat to election decision officer : ‘कार्यक्रम करू’ निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला थेट धमकी

Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी थेट पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांना धमकी दिली. लाटकर यांचा ‘लाट्या’ असा एकेरी उल्लेख करीत अधिकारी मनाने बदलला नाही तर त्याचा ‘कार्यक्रम’ खासदार म्हणून स्वतः करून दाखवू, असे विधान सोनवणे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने परळी नगरपरिषदेसाठी उमेदवार दिल्यानंतर दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविले गेले. हे अर्ज कोणाच्यातरी दबावाखाली बाद करण्यात आल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात येत आहे. याच प्रकरणावरून संतप्त झालेल्या बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, आमच्या एका अर्जाला एक न्याय आणि दुसऱ्या अर्जाला वेगळा न्याय होत आहे. लाटकर नावाचा आहे लाट्या… लोकसभा, विधानसभा आणि आता नगरपरिषद सगळीकडे तोच. मनानं बदलला तर ठीक, नाहीतर त्याचा काय कार्यक्रम करायचा ते खासदार म्हणून मी करीन, असे ते म्हणाले.

Gauri Palve suicide case : पंकजा मुंडेंचे पीए अखेर पोलिसांसमोर हजर

यापुढे ते म्हणाले की, कोर्टाचा निकाल लागेल, मग मी त्याला सांगतो काय असतं ते. एक फॉर्म त्याने निरंक केला आहे म्हणून बाद होतो आणि त्याच प्रकारचा दुसरा फॉर्म वैध ठरतो. हे आम्ही कोर्टात मांडणार आहोत. लाट करणे, लाटणे बंद केले पाहिजे, नाहीतर लाटणे घेऊन बाया त्याच्या मागे येतील, अशी वादग्रस्त टिपणी सोनवणे यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा एकेरी उल्लेख आणि धमकीवजा भाषेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात राजकीय तणाव वाढत असून खासदारांच्या अशा वक्तव्यामुळे वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

______