Arrested at midnight, will be produced in court today : मध्यरात्री अटक, आज न्यायालयात हजर करणार
Mumbai: पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी संध्याकाळी वरळी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर मुंबईत मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात रविवारी रात्री उशिरा वरळी पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या आरोपांमुळे कारवाईला वेग आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अनंत गर्जे काही तास फरार होते. मात्र अखेर मध्यरात्रीनंतर 1 वाजता त्यांनी वरळी पोलिस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले असून सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांकडून कोठडीची मागणी करण्यात येईल, तर गर्जेंच्या वकिलांकडून जामिनासाठी जोरदार युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणातील पुढील तपशील आजच्या सुनावणीत स्पष्ट होणार आहे.
Maharashtra politics : न बोलण्यासारखं काहीही घडलं नाही, वेड्यांचा बाजार सुरु आहे
या प्रकरणाबाबत अनंत गर्जे यांनी एक लेखी निवेदन जारी केले आहे. पत्नीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर 24 तारीखेला मध्यरात्री स्वखुशीने पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि निष्पक्ष तपास व्हावा, म्हणून स्वतःहून हजर झाल्याचा उल्लेख त्यांनी निवेदनात केला आहे. तपासासाठी आवश्यक ती सर्व माहिती देण्यास आणि सहकार्य करण्यास ते तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूनंतर अनंत गर्जे यांनी मृतदेह नायर रुग्णालयात आणला, तेव्हाच पोलिसांनी त्यांना अटक केली नाही, त्यांना सोडून का दिले, अशी विचारणा दमानिया यांनी केली आहे. या प्रश्नांमुळे तपास प्रक्रियेवर अधिकच चर्चा सुरू झाली आहे.
Rane Vs Chavan : अती होतंय… आम्ही सहन करतोय ते राणे साहेबांसाठीच, बाकी कुणासाठी नाही !
गौरी पालवे-गर्जे यांचा मृत्यू, त्यानंतरची पोलीस कारवाई, अनंत गर्जे यांचे मध्यरात्री आत्मसमर्पण आणि आजची कोर्टातील सुनावणी या सगळ्यांमुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनले आहे. आज न्यायालयात कोणते नवीन तपशील समोर येतात आणि पुढील तपासाला कोणते वळण मिळते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








