व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Weather updates : पुढील ६ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट

Weather updates : पुढील ६ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट

rain-weather-updates-yellow-alert-mumbai-thane-konkan-marathwada-vidarbha-monsoon-forecast : मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधार सरींचा इशारा, जाणून घ्या हवामान अपडेट

Mumbai : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील सहा दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरीसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने शेतीसह जनजीवनालाही दिलासा मिळाला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून २ जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टी, संपूर्ण कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या हवामान प्रणालीचा परिणाम राज्यावर जाणवणार असून १ आणि २ जुलैदरम्यान तळकोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, २ ते ९ जुलै या कालावधीत मुंबई महानगर प्रदेश, उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या भागांत काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते.

Union cabinet reshuffle : श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपदाची चर्चा, प्रतापराव जाधव यांचे मंत्रिपद धोक्यात?

मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात तीन ते चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. ठाण्यात रात्री अवघ्या एका तासात सुमारे २९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबई शहर आणि उपनगरांतही रात्रभर पावसाच्या सरी कोसळल्या. विलेपार्ले, वाशी, पनवेल आणि परिसरातही चांगला पाऊस झाला असून आज दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता कायम असल्याचे सांगण्यात आले आहे.

तळकोकणातही मान्सूनने पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यासाठी ३ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ९८ मिलीमीटर पाऊस झाला. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

unseasonal rainfall : शेतकऱ्यांना मदत मिळताच श्रेय घेण्यासाठी नेते ‘फ्रंट फुट’वर!

रत्नागिरी जिल्ह्यातही कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. दापोली तालुक्यातील प्रसिद्ध कोंडी धबधबा पुन्हा एकदा दिमाखात वाहू लागल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पर्यटननगरी लोणावळ्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. मात्र, एकूण हंगामी पावसाचा आकडा अद्यापही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असल्याने आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, नदी-नाले आणि धबधब्यांच्या परिसरात अनावश्यक गर्दी टाळावी तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतीसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असला तरी काही भागांत मुसळधार पावसामुळे पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

__

error: Content is protected !!