union-cabinet-reshuffle-2026-shrikant-shinde-cabinet-minister-prataprao-jadhav : उद्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; केंद्रात कुणाला मिळणार संधी, जाणून घ्या संपूर्ण घडामोडी
Mumbai: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराकडे देशाचे राजकीय लक्ष लागले असून मंगळवारी (३० जून) मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून आज भारतात परतणार असून त्यानंतर पुन्हा पुढील दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील खासदारांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला या विस्तारात मोठे प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पक्षाचे राजकीय महत्त्व वाढल्याचे मानले जात असून त्याचा लाभ मंत्रिमंडळ विस्तारात मिळू शकतो.
unseasonal rainfall : शेतकऱ्यांना मदत मिळताच श्रेय घेण्यासाठी नेते ‘फ्रंट फुट’वर!
शिवसेनेकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. पक्षातील सूत्रांनुसार त्यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेला यावेळी प्रथमच एक महत्त्वाचे कॅबिनेट खाते मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यासाठी श्रीकांत शिंदे हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
राज्यमंत्रीपदासाठीही मोठी चुरस असल्याचे चित्र आहे. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी माहिती पक्षातील सूत्रांकडून समोर येत आहे. संजय जाधव सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले असून मराठवाड्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
TET paper leak : टीईटी पेपरफुटीवरून राजकारण तापले; सपकाळ-कुलकर्णी आमनेसामने
दुसरीकडे, सध्या आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य मंत्रालयातील राज्यमंत्री म्हणून काम पाहणारे प्रतापराव जाधव यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या कामकाजाबाबत केंद्रातील काही स्तरांवर नाराजी असल्याचे बोलले जात असून त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना वगळले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
शिवसेनेतही विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही भागांना प्रतिनिधित्व देण्याबाबत अंतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. एका बाजूला ज्येष्ठ खासदार म्हणून प्रतापराव जाधव यांचा विचार, तर दुसऱ्या बाजूला मराठवाड्यात पक्ष विस्तारासाठी संजय जाधव यांना संधी देण्याची भूमिका यामुळे पक्षात राजकीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान डॉ. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानेही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांनी सुमारे चार किलोमीटर पायी चालत दर्शन घेतल्याची माहिती समोर आली असून त्यानंतर त्यांच्या नावांची चर्चा आणखी वेगाने सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राला किती जागा मिळणार, शिवसेनेच्या वाट्याला कॅबिनेट आणि राज्यमंत्री अशी दोन पदे येणार का, तसेच प्रतापराव जाधव यांचे मंत्रिपद कायम राहणार की नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यांच्याकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
___








