6,202 duplicate voters found in Akola Municipal Corporation area : दुबार मतदारांची छायाचित्रे निवडणूक आयोगाकडे सादर
Akola दुबार मतदारांचा शोध घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अकोला महापालिका प्रशासनाने शहरात दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत १७ हजार ७३२ संभाव्य दुबार मतदारांपैकी सुमारे ६ हजार २०२ दुबार मतदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मतदान केंद्र निश्चितीबाबत आढावा बैठक शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. येत्या सोमवार, २२ डिसेंबरपर्यंत दुबार मतदारांचा शोध पूर्ण करून मतदान केंद्र निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Illegal gravel excavation : तहसीलदाराच्या पथकावर हल्ला; मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की,
मतदार यादीतील घोळ व दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यानंतर आयोगाने महापालिका प्रशासनाला दुबार मतदारांचा शोध घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले. दुबार नावे शोधून संबंधित मतदारांकडून हमीपत्र लिहून घेणे, छायाचित्रांची तपासणी करणे आदी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ही मोहीम सुरू केली असल्याची माहिती अनिल बिडवे यांनी दिली.
महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन दुबार मतदारांचा शोध घेत आहेत. मात्र, काही नागरिक सहकार्य करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दुबार नावे असूनही कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार, याबाबत लेखी माहिती देण्यास काही मतदार तयार नाहीत. अशा मतदारांची छायाचित्रे काढून त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येत आहे. नागरिकांनी या मोहिमेसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे.
शहरात आगामी महापालिका निवडणुकीसाठी सुमारे ५ लाख ५० हजार मतदार असून, ९०० मतदारांमागे एक मतदान केंद्र गृहित धरल्यास सुमारे ६१० मतदान केंद्रांची आवश्यकता आहे. काही ठिकाणी मतदारसंख्या कमी असल्याने सुमारे १५ वाढीव मतदान केंद्रांसह एकूण ६२५ मतदान केंद्रांसाठी जागा निश्चितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी लवकरच जाहीर केले जाणार आहेत.
प्रभागनिहाय मतदारांचा शोध घेण्यात येत असून, एका व्यक्तीचे नाव किती वेळा आणि कोणत्या प्रभागात आहे, याची तपासणी केली जात आहे. नाव, वडिलांचे नाव, लिंग व छायाचित्र समान आढळल्यास दुबार नावे निश्चित केली जात आहेत. यासाठी गृहभेटीची कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
Nitin Gadkari : महाराष्ट्रासाठी दीड लाख कोटींच्या रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी
गृहभेटींसाठी महापालिकेच्या विविध विभागांतील १०० कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवडणूक विषयक कामासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कर्मचारी गृहभेट देऊन मतदारांकडून परिशिष्ट-१ भरून घेत आहेत. एखादा मतदार घरी उपलब्ध नसल्यास त्यांच्या घरावर सूचना चिकटवून संबंधित झोन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.








