No proposal yet for inclusion of MNS, clarified : मनसेच्या समावेशाबाबत अद्याप प्रस्ताव नसल्याचे राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण
Amravati आगामी महापालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी संयुक्तपणे लढणार असल्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी मांडली. तसेच महाविकास आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास त्यावर तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी अमरावती येथे आले असता, आ. शशिकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, शहराध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, माजी आमदार रमेश बंग आदी उपस्थित होते.
Local Body Elections : अकोला महापालिकेत तीन वर्षांनंतर प्रशासकराज संपणार
आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, हिवाळी अधिवेशन विदर्भात झाल्याने येथील प्रश्न व समस्यांवर ठोस धोरणात्मक निर्णय अपेक्षित होते. विदर्भासाठी भरीव निधीची आशा होती; मात्र पुरवणी मागण्या मंजूर करून अधिवेशन आटोपण्यात आले. नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला असून, मतदार यादीतील घोळ पाहता महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुका पूर्णपणे लोकशाही पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घ्यावी, अशी आमची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
Local Body Elections : नऊ जागांसाठी रणधुमाळी नाहीच! तीन पालिकांची निवडणूक; प्रचाराचा सूर मंद
महाविकास आघाडीनेच निवडणुका लढवण्याबाबत आम्ही सहमत असल्याचे सांगत, मनसेच्या समावेशासंदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. मनसेचा प्रश्न राज्यभराचा नसून मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक या शहरांपुरता अधिक मर्यादित आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अमरावती महापालिकेच्या संदर्भात शहरातील पक्षाची संघटनात्मक ताकद पाहून उमेदवार निश्चित करण्यात येतील, तसेच त्यानुसार जागावाटप केले जाईल, असेही आ. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.








