New political front in the making in Akola : अकोल्यात नवी राजकीय आघाडी उभारण्याची तयारी
Akola ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अकोल्यातील भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. भाजपमधील नाराज आणि बंडखोर नेते एकत्र येत महापालिका निवडणुकीसाठी स्वतंत्र नवी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, या आघाडीचे नेतृत्व भाजपचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे पुतणे आणि माजी नगरसेवक आशिष पवित्रकार करणार असल्याची माहिती आहे.
अकोला भाजपात सध्या दोन गट स्पष्टपणे सक्रिय आहेत. एक गट माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली आहे, तर दुसरा गट माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील बंडखोरांची स्वतंत्र आघाडी उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
Local Body Elections : १७ हजार मतदारांच्या हाती चार नगरसेवकांचा कौल; खामगावमध्ये पोटनिवडणुकीची रंगत
या नव्या आघाडीसाठी आशिष पवित्रकार यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्यासोबत अकोल्याचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदानी तसेच भाजपचे माजी महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांचा समावेश आहे. आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यासाठी या नेत्यांनी शहरातील ‘बंधन लॉन’ येथे सहविचार सभा आयोजित केली होती. या सभेला भाजपातील अनेक नाराज नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते हरीश आलिमचंदानी यांनी मागील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली होती. या निवडणुकीत त्यांनी २१ हजारांहून अधिक मते मिळवली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांचा अवघ्या १,२८३ मतांनी पराभव झाला होता. याच निवडणुकीत भाजपचे माजी महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत सुमारे २,१०० मते मिळवली होती.
या पार्श्वभूमीवर भाजपने डॉ. रणजित पाटील गटाशी संबंधित असल्याचे मानले जाणारे हरीश आलिमचंदानी, आशिष पवित्रकार आणि डॉ. अशोक ओळंबे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र, हे सर्व नाराज व बंडखोर नेते आता एकत्र येत भाजपसमोर महापालिका निवडणुकीत मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








