Sushma Andhare firmly claims hotel belongs, showing evidence from mobile phone : सुषमा अंधारेंनी मोबाईलवरूनच पुरावे दाखवत ‘ते हॉटेल त्यांचंच’ असा ठाम दावा
Mumbai: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या कथित रिसॉर्टमध्ये १४५ कोटी रुपयांचे ड्रग्स सापडल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर प्रकाश शिंदे यांनी आपण ते हॉटेल चालवत नसून ते दुसऱ्याला चालवायला दिल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारेंनी थेट मोबाईलवरून पुरावे दाखवत प्रकाश शिंदेंचे सर्व दावे खोटे असल्याचा आरोप केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, काल प्रकाश शिंदे माध्यमांशी बोलताना सातत्याने भूमिका बदलत होते. आधी ते ‘तो प्रकाश शिंदे नाही’ असं सांगत होते, मग ‘तोच प्रकाश शिंदे आहे’ असं मान्य केलं, आणि आता ‘ती जागा दुसऱ्याला दिली आहे’ असा दावा करत आहेत. हा प्रकार म्हणजे सतत कथा बदलण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. याआधीही अशाच पद्धतीने काही प्रकरणांमध्ये वेगवेगळे खुलासे करण्यात आले होते, असा टोला अंधारेंनी लगावला.
Dhananjay Munde : दिल्लीतील भेटीनंतरही धनंजय मुंडेंचं मंत्रिपदाचं स्वप्न अधुरंच?
पत्रकार परिषदेत सुषमा अंधारेंनी आपल्या मोबाईलवरून गुगल सर्च करत ‘हॉटेल तेजयश’ संदर्भातील माहिती माध्यमांसमोर मांडली. त्यांनी सांगितलं की, गुगलवर या हॉटेलला ४.८ रेटिंग आहे, ऑनलाइन बुकिंगची सुविधा आहे, मॅप, शेअर ऑप्शन आणि व्हॉट्सॲप नंबरही दिलेला आहे. त्या व्हॉट्सॲप नंबरवर क्लिक केल्यानंतर ‘प्रकाश शिंदे’ असं नाव दिसत असल्याचं अंधारेंनी दाखवलं. त्यामुळे हे हॉटेल अजूनही प्रकाश शिंदेच चालवत असल्याचा ठाम दावा त्यांनी केला.
अंधारे पुढे म्हणाल्या की, जर ही जागा कमर्शियल नसेल, तर तिला रेटिंग, ऑनलाइन बुकिंग आणि संपर्क क्रमांक कसे काय मिळाले, हा प्रश्नच महत्त्वाचा आहे. आपण भावनेने नाही, तर लॉजिक आणि पुराव्यांच्या आधारे बोलत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या विश्वासाचा हा विषय असून, ड्रग्समधून कमावलेला पैसा निवडणुकीत वापरला जात असेल तर लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणावर बोलताना सुषमा अंधारेंनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही थेट प्रश्न विचारले. मुंबई पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही स्थानिक यंत्रणा शांत का होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पाचगणीसारख्या मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनस्थळी ड्रग्स आणि कोकेनचा विळखा असेल आणि पालकमंत्र्यांना याची कल्पना नसेल, तर त्यांनी पालकमंत्रीपदावर राहावं का, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Pragya Rajiv Satav : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांचा राजीनामा,
याच पत्रकार परिषदेत सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागितला. वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला, तर इथे प्रकाश शिंदे हे थेट एकनाथ शिंदेंचे भाऊ आहेत, असं सांगत त्यांनी समान न्यायाची मागणी केली. उपमुख्यमंत्रीपदामुळे तपासावर प्रभाव पडू शकतो, असं वाटत असेल तर एकनाथ शिंदेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी अंधारेंनी केली आहे.
१४५ कोटींच्या ड्रग्सप्रकरणावरून आता आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून, सुषमा अंधारेंनी सादर केलेल्या पुराव्यांनंतर सरकार आणि तपास यंत्रणांची भूमिका काय राहते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.








