Nagar Parishad Result : चंद्रपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का!

Sudhir Mungantiwar regrets losing the municipal council : नगरपरिषदा हातातून गेल्याची सुधीर मुनगंटीवारांना खंत

Chandrapur : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालात एकीकडे महायुतीला राज्यभरात यश मिळालं असलं, तरी चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाला जबर धक्का बसल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य नगरपरिषदा भाजपाच्या हातातून निसटल्या असून काँग्रेसने मोठी सरशी साधली आहे. या निकालानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खंत व्यक्त केली आहे आहे.

राज्यात जाहीर झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुती एकूणच वरचढ ठरली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांनी बहुतांश ठिकाणी सत्ता मिळवली असली, तरी काही जिल्ह्यांत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी बाजी मारली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेत शिंदे गटाचा सुपडा साफ झाला, तर काही ठिकाणी काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील निकाल सर्वाधिक चर्चेत आला आहे.

Local body elections : जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक विजयी; दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस

 

चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांपैकी बहुतांश ठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे. काँग्रेसने सात नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद जिंकत आपली ताकद दाखवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पराभवाची कारणमीमांसा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील दुर्लक्ष आणि नेतृत्वाच्या निर्णयांवर बोट ठेवलं आहे.
“विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांतून एकाही नेत्याला मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. मला स्वतःला मंत्रिपद दिलं नाही, ही गोष्ट वेगळी, पण संपूर्ण विदर्भातील या भागाकडे दुर्लक्ष झालं,” अशी खंत मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्राचा नेता म्हणून पुढे आणलं, मात्र भाजपाने विदर्भातील नेत्यांना संधी दिली नाही, असा टोला त्यांनी लगावला.

याशिवाय, “आपण बाहेरच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर पक्षात घेत आहोत. त्याचा परिणाम स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारांवर झाला आहे. या सगळ्याचा फटका निकालात दिसून आला,” असं स्पष्ट मतही मुनगंटीवार यांनी मांडलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाच्या अंतर्गत नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Local body elections : जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक विजयी; दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस

चंद्रपूर जिल्ह्यातील निकालांचा विचार करता काँग्रेसने सात नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद मिळवलं आहे. भाजपाला केवळ दोन ठिकाणी यश मिळालं असून शिंदे गटाला एका नगरपरिषदेत विजय मिळाला आहे, तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर राहिला आहे. भद्रावती येथे शिवसेना (शिंदे गट) तर चिमूर आणि भिसी नगरपंचायतीत भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित बहुतेक नगरपरिषदांमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली आहे.
एकूणच, चंद्रपूर जिल्ह्यातील हा निकाल भाजपासाठी धक्का देणारा ठरला असून, सुधीर मुनगंटीवार यांच्या स्पष्ट आणि थेट वक्तव्यामुळे विदर्भातील असंतोष पुन्हा उघड झाला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा इशारा भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.