BJP’s victory due to strong leadership and planning : भाजपचा सलग दुसऱ्यांदा झेंडा; देशमुखांची उमेदवारी ठरली ‘जिंकणारी चाल’
Chikhli जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या चिखली नगरपरिषद निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता कायम राखत आपले वर्चस्व सिद्ध केले. आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली संघटनात्मक ताकद, नियोजनबद्ध प्रचार आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांचा मेळ साधत भाजपने पालिकेवर पुन्हा झेंडा फडकावला. नगराध्यक्षपदासाठी पंडितराव देशमुख यांच्या रूपाने निष्ठावंत, सर्वसमावेशक आणि जनतेशी सहज नाते जुळवणारा चेहरा पुढे करून भाजपने सत्तेचा सोपान गाठला.
या निवडणुकीत शहरातील राजकीय समीकरणे पाहता काँग्रेस–भाजपमध्ये तुल्यबळ लढत अपेक्षित होती. मात्र, सत्तेत असूनही भाजपने ही निवडणूक हलक्यात न घेता प्रत्येक प्रभागात काटेकोर नियोजन केले. आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेप्रमाणेच परिश्रम घेत थेट जनतेशी संवाद साधला. ‘भय नव्हे, विकास’ हा स्पष्ट संदेश देत त्यांनी प्रचारात विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले.
Local Body Elections : आजी–माजी आमदारांना मतदारांचा समसमान कौल!
आमदार महाले यांनी गेल्या काही वर्षांत चिखलीसाठी मिळवून दिलेला कोट्यवधींचा विकासनिधी, पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, स्वच्छता व्यवस्था, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापन, तसेच तलावांचे पुनरुज्जीवन यांसारख्या पायाभूत सुविधांचा ठोस लेखाजोखा मतदारांसमोर मांडला. या विकासाभिमुख मांडणीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि चिखलीकरांनी पुन्हा एकदा पालिकेची सूत्रे भाजपच्या हाती दिली.
केंद्र व राज्यात भाजपचे सरकार, स्थानिक पातळीवर आमदार आणि आता नगरपालिका—गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेची साखळी कायम राहिल्याने चिखलीच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास राजकीय गोटात व्यक्त केला जात आहे.
ही निवडणूक सर्वच पक्षांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारी ठरली. काँग्रेससाठी वातावरण काहीसे पोषक असतानाही जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे प्रचारादरम्यान शहराच्या मुद्द्यांपेक्षा ग्रामीण प्रश्नांकडे अधिक वळल्याची चर्चा झाली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबतही पक्षांतर्गत मतभेद उघड झाले. काशीनाथ बोंद्रे यांची उमेदवारी न्याय्य असली, तरी त्यावर घराणेशाहीचा ठपका बसल्याची प्रतिक्रिया उमटली.
Local body elections : ईव्हीएमवर आधी राष्ट्रीय पक्ष, मग प्रादेशिक पक्ष आणि शेवटी अपक्ष;
भाजपने पंडितराव देशमुख यांच्या रूपाने जनसंघापासूनचे निष्ठावंत, सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळणारे आणि स्वीकारार्ह नेतृत्व दिले. त्यांच्या पाठीशी आमदार श्वेता महाले खंबीरपणे उभ्या राहिल्या. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत मिळालेली निर्णायक आघाडी ही देशमुखांची उमेदवारी चिखलीकरांना भावल्याचे स्पष्ट संकेत देणारी ठरली.








