Message claiming defeat received before the results, suspicion of EVM tampering : ईव्हीएम छेडछाडीचा संशय; तेल्हारा येथील पराभूत उमेदवाराची पोलिसांत तक्रार
Akola नगरपरिषद निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीत पराभव होणार असल्याचा मेसेज मोबाईलवर प्राप्त झाल्याचा दावा करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सचिन थाटे यांनी मतदान यंत्रात (ईव्हीएम) छेडछाड झाल्याचा संशय व्यक्त केला असून, याप्रकरणी त्यांनी तेल्हारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शिवानी थाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३५ वाजता एका अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांकावरून “तुम्ही निवडणूक ९४१ मतांनी हरणार आहात” असा संदेश त्यांना प्राप्त झाला. हा संदेश ज्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून पाठवण्यात आला, त्या प्रोफाइलवर भाजपचे निवडणूक चिन्ह तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो वापरण्यात आला होता. तसेच प्रोफाइलवर ‘साकेत कुमार, पीएस टू होम मिनिस्टर’ असा मजकूरही दिसून आल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.
Local Body Elections : नगराध्यक्ष एका पक्षाचा, बहुमत दुसऱ्यालाच
विशेष म्हणजे, प्रत्यक्ष निवडणूक निकालात शिवानी थाटे यांचा १,२४१ मतांनी पराभव झाला. त्यामुळे मतमोजणीपूर्वीच पराभवाचा अंदाज देणारा मेसेज कसा आला, याबाबत संशय निर्माण होत असून, ईव्हीएम यंत्रणेमध्ये छेडछाड झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ही तक्रार सायबर गुन्ह्याशी संबंधित असल्याने ती सायबर पोलिस शाखेकडे पाठवण्यात आली असल्याची माहिती तेल्हारा पोलीस निरीक्षक प्रकाश तूनकुलवार यांनी दिली.
Local Body Elections : निकालांनी दिला ‘ट्रेन्ड’ बदलाचा इशारा; काँग्रेसची पकड सैल!
“सायबर शाखेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, “मतमोजणीपूर्वीच मी पराभूत होणार असल्याचा मेसेज माझ्या मोबाईलवर आला. त्यामुळे याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे,” असे शिवानी सचिन थाटे यांनी सांगितले.








