Shock to Jorgewar : आमदार जोरगेवारांना धक्का ; चंद्रपूर निवडणूक प्रमुख पदावरून हटवले

BJPs big decision, excitement in political circles : भाजपचा मोठा निर्णय, राजकीय वर्तुळात खळबळ

Chandrapur: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश भाजपने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला असून, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना थेट निवडणूक प्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या फेरनियुक्त्यांमध्ये हा बदल करण्यात आला. याआधी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे निवडणूक प्रमुख म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची गच्छंती करून त्यांच्याजागी माजी खासदार अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Activists anger : आ. किशोर जोरगेवार, आपण ही मोठी चूक केली…! कार्यकर्त्यांचा संताप

विशेष म्हणजे, हा बदल केवळ औपचारिक नसून, आमदार जोरगेवार यांच्यावरील पक्षाचा विश्वास डळमळीत झाल्यामुळे त्यांना हटवले असे बोलले जात आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, पक्षसंघटन, समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत नाराजी यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. चंद्रपूरसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकेत भाजप कोणतीही जोखीम घ्यायला तयार नसल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते.

दरम्यान, या गच्छंतीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, हा निर्णय म्हणजे जोरगेवार यांना दिलेला जोरदार धक्का मानला जात आहे.

__