Local Body Elections : बहुपक्षीय लढतीत काँग्रेसची सरशी; लोणारमध्ये मतविभाजनाचा डाव फसला!

Vote-division plan backfires in Lonar : उद्धवसेनेसह सहा उमेदवारांची अनामत जप्त, काँग्रेसचे ८ नगरसेवक; उपाध्यक्षपदाकडे लक्ष

Lonar लोणार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व प्रकारच्या राजकीय तर्क-वितर्कांना छेद देत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. मतविभाजन, आघाड्या-युती आणि ‘अँटी काँग्रेस’ समीकरणांवर उभ्या राहिलेल्या विरोधकांच्या रणनीतीला मतदारांनी स्पष्ट नकार देत काँग्रेसच्या एकहाती वर्चस्वावर शिक्कामोर्तब केला. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत काँग्रेसने निर्विवाद आघाडी राखत विजय निश्चित केला.

काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मीरा भूषण मापारी यांनी ६,४६७ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर ३,८८८ मतांची निर्णायक आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला. हा विजय केवळ आकड्यांचा नसून, लोणारच्या राजकारणात काँग्रेस अजूनही जनविश्वासाची ताकद आहे, याची ठोस साक्ष देणारा ठरला आहे.

Local Body Elections : २७ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदाची निवडणूक

बहुपक्षीय रिंगण, पण कौल स्पष्ट

या निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासह एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. मात्र अपेक्षित मतविभाजन न होता मतदारांनी स्पष्टपणे काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. परिणामी उद्धवसेनेसह सहा उमेदवारांची अनामत जप्त झाली. हा निकाल विरोधकांसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

अपक्षांचा प्रभाव; परिषदेत नवी समीकरणे

या निकालातील महत्त्वाचा पैलू म्हणजे अपक्ष उमेदवारांची लक्षणीय कामगिरी. अपक्ष नगरसेवकांनी अनेक प्रस्थापित नेत्यांची गणिते बिघडवली असून नगर परिषदेत नवी सत्तासमीकरणे आकाराला येण्याची चिन्हे आहेत. जरी नगराध्यक्षपदावर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले असले, तरी दैनंदिन कारभारात समन्वय व राजकीय जुळवाजुळव महत्त्वाची ठरणार आहे.

या निवडणुकीत काँग्रेसचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत. आता सर्वांचे लक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे. निवडणूक काळात ‘स्वीकृत नगरसेवक’ पदाबाबत दिलेल्या आश्वासनांमुळे कोणाच्या गळ्यात माळ पडते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Shock to Jorgewar : आमदार जोरगेवारांना धक्का ; चंद्रपूर निवडणूक प्रमुख पदावरून हटवले

लोणारचा हा निकाल निर्णायक व दिशादर्शक मानला जात असून काँग्रेसचा तालुका व जिल्हास्तरावरील आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी हा निकाल ‘मॉडेल’ म्हणून वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात लोणार नगरपरिषद व जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग येणार हे निश्चित मानले जात आहे.