Talks on seat sharing fall apart, political turmoil : जागावाटपावरून बोलणी फिस्कटली, राजकारणात खळबळ
Amaravati : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर युती आणि आघाड्यांच्या हालचालींना वेग आला असतानाच अमरावतीतून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेली युतीची बोलणी अखेर फिस्कटली असून दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत एकत्र असल्या तरी महापालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक समीकरणांनुसार वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर झाली असली तरी अमरावतीत मात्र दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत होऊ शकले नाही. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत सेना–भाजप युती होणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र प्रत्यक्षात दोन्ही पक्षांतील मतभेद मिटू शकले नाहीत.
Solapur Municipal Election : भाजपकडून सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिंदे गटाची राष्ट्रवादीशी युती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने अमरावती महानगरपालिकेसाठी भाजपकडे २५ जागांची मागणी केली होती. मात्र हा प्रस्ताव भाजपने नाकारल्याचे समजते. दुसरीकडे भाजपकडून शिवसेनेला एकूण ८७ जागांपैकी केवळ १५ ते १६ जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. या जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये सहमती न झाल्याने अखेर युती तुटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अमरावती महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे.
सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सर्वच पक्षांची लगबग सुरू आहे. राज्यात सत्ताधारी युती असूनही अमरावतीत भाजप आणि शिवसेना वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा थेट फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Municipal election : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठी राजकीय घडामोड
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते अमरावतीतील पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
२०१७ च्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ४५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते आणि चेतन गावंडे महापौर झाले होते. त्या वेळी काँग्रेसने १५, शिवसेनेने ७, एमआयएमने १०, बहुजन समाज पार्टीने ५, युवा स्वाभिमान पक्षाने ३, आरपीआय आठवले गटाने १ तर एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला होता. आता २०२५ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्यास अमरावतीतील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
__








