Amravati Municipal Corporation Election : अमरावतीत महापरिश्रमानंतर महायुतीवर शिक्कामोर्तब

BJP to Contest 49 Seats, Shiv Sena 17, Yuva Swabhiman 9 : भाजप ४९, शिवसेना १७, युवा स्वाभिमान ९ जागांवर लढणार

Amravati गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांच्या, बैठकींच्या आणि वाटाघाटींच्या फेरीअखेर भाजप व शिवसेना (शिंदे गट) युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले असून भाजप ४९, शिवसेना (शिंदे गट) १७ तर युवा स्वाभिमान ९ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे समजते. मात्र, शिवसेना (शिंदे गट) मधील नाराजी उघडपणे समोर आली असून माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी बैठकीतून ‘वॉकआऊट’ केल्याने युतीतील तणाव स्पष्ट झाला आहे.
शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये भाजप व शिवसेना (शिंदे गट) नेत्यांमध्ये युतीसंदर्भात चर्चा झाली. मात्र, दीर्घ चर्चेनंतरही निर्णय न झाल्याने दुपारी सुमारे २.३० वाजता शिवसेना (शिंदे गट) चे नेते तथा जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गोडे वैद्यकीय महाविद्यालय गाठले. तेथे भाजपचे आमदार संजय कुटे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, डॉ. नितीन धांडे, दिनेश सूर्यवंशी तसेच शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार संजय रायमुलकर, अभिजित अडसूळ, श्याम देशमुख, आशिष धर्माळे आदी उपस्थित होते. याच बैठकीत अंतिम जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

PMC election : भाजपचा धाडसी प्रयोग; तरुण आणि महिलांना प्राधान्य

युतीसंदर्भातील बैठकीनंतर शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी सांगितले की, “भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती व्हावी हीच आमची इच्छा आहे. युती न झाल्यास दोन्ही पक्षांचे नुकसान होऊ शकते. भाजपकडे आम्ही २५ जागांची मागणी केली होती. जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होईल.”

Akola Municipal Corporation Election : भाजप–राष्ट्रवादी युती, शिवसेना चर्चेतून बाहेर

गोडे महाविद्यालयात अंतिम निर्णय झाल्यानंतर जलसंधारण मंत्री संजय राठोड व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी अमरावती गाठली. त्यानंतर सायंकाळी सुमारे ६.३० वाजता शहरातील एका बड्या हॉटेलमध्ये शिवसेना (शिंदे गट) च्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली. या बैठकीस माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार अभिजित अडसूळ, ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रीती बंड, श्याम देशमुख, आशिष धर्माळे उपस्थित होते. मात्र, बैठकीच्या अवघ्या अर्ध्या तासातच माजी मंत्री जगदीश गुप्ता बाहेर पडले. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत बोलणे टाळले.