BJP–NCP form alliance; Shivsena excluded from talks : दहा दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेतून अखेर निघाला मार्ग
Akola महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाटाघाटींना निर्णायक वळण मिळाले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांच्यात जागा वाटपावर एकमत झाले; मात्र शिवसेना (शिंदे गट) सोबतची चर्चा निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष युती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
बैठकीला राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे महानगराध्यक्ष विजय देशमुख, भाजपचे निवडणूक प्रभारी विजय अग्रवाल, भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने, मदन भरगड यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. युती जाहीर झाल्याने अकोला महापालिका निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून युतीबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर रात्री उशिरापर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. अखेर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्यानंतर जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार आगामी महापालिका निवडणुकीत भाजप ६६ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष १४ जागांवर उमेदवार उभे करणार आहे.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) सोबत युतीसाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. प्रत्येक प्रभागात प्रत्येकी एक, अशा एकूण २० जागांचा प्रस्ताव शिवसेना (शिंदे गट) समोर ठेवण्यात आला होता. यामध्ये भाजपकडून १४ जागांवर सहमती दर्शविण्यात आली होती, तसेच दोन जागा कमी-जास्त करण्याचीही तयारी दाखविण्यात आली; मात्र अंतिम टप्प्यावर तडजोडीचा तोडगा न निघाल्याने शिवसेना (शिंदे गट) चर्चेतून बाहेर पडली.
Municipal election : अन्नत्याग, पक्षांतर आणि स्मशानभूमीतील एबी फॉर्ममुळे राजकीय नाट्य
अकोला महानगरपालिकेतील २० प्रभागांमधील एकूण ८० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे ४८, राष्ट्रवादीचे ५ आणि शिवसेनेचे ८ नगरसेवक निवडून आले होते. एकूण ६१ जागांवर या तिन्ही पक्षांचे वर्चस्व होते. मात्र यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक असतानाही शिवसेना (शिंदे गट) सोबत तडजोड न झाल्याने अखेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांनी स्वतंत्रपणे युती जाहीर करत महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्रित लढत देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.








