Heated discussion of that formula lead to revolt by disgruntled loyalists : त्या फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा, नाराज निष्ठावंतांचं बंड शमेल का?
Mumbai : सरते वर्ष भाजपसाठी अंतर्गत बंडखोरीमुळे विशेष गाजले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संताप अनेक शहरांत उफाळून आला. कुठे अन्नत्याग आंदोलन झाले, कुठे मंत्र्यांच्या गाड्यांना घेराव घालण्यात आला, तर कुठे भावनावेग अनावर होऊन कार्यकर्ते कोसळल्याच्या घटनाही घडल्या. या सर्व घडामोडींची गंभीर दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून बंडखोरी शमवण्यासाठी ते थेट मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक भाजप निष्ठावंतांसाठी हे वर्ष धक्कादायक ठरले. पक्षासाठी जीव ओतून काम केले, कार्यकर्ते जोडले, कार्यक्रम राबवले, मंडपापासून सतरंज्यांपर्यंत सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या, मात्र उमेदवारी जाहीर होताच नाव कापले गेल्याने अनेकांचा संताप उफाळून आला. ज्या नेत्यांसाठी रात्रंदिवस काम केले, तेच नेते उमेदवारी नाकारल्यानंतर फोनही उचलत नसल्याचा आरोप करत निष्ठावंतांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
Cabinet meeting : अंबादेवी संस्थानाला चिखलदरातील ३ एकर ८ आर जमीन विनामूल्य देण्यास मंजुरी
ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रमुख शहरांतील बंडखोर आणि नाराज कार्यकर्त्यांशी थेट संवाद सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. अनेक अपक्ष उमेदवारांशी निवडणुकीतून माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः चर्चा केल्याचे सांगितले जाते. बंडखोरी शमवण्यासाठी काहींना राजकीय पुनर्वसनाचा शब्द देण्यात आला असून, तर काही प्रकरणांत स्थानिक नेत्यांवर मनधरणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवरही बंडखोरी रोखण्यासाठी हालचाली वेग घेत आहेत. भाजपचे स्थानिक नेते अनेक बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढत आहेत. पक्षशिस्त, संयम आणि भविष्यातील संधी यांची आठवण करून देत कुटुंबीयांशीही संवाद साधला जात आहे. काही नेते स्वतःच्या राजकीय प्रवासाचे उदाहरण देत ‘पक्षाने कधी ना कधी न्याय दिलाच’ असा विश्वास बंडखोरांना देत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, गोरेगावमधील भाजप बंडखोरी शांत करण्यात पक्षाला यश मिळाल्याचे चित्र आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या मध्यस्थीमुळे अपक्ष उमेदवार संदीप जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. प्रभाग क्रमांक ५४ मधून इच्छुक असूनही उमेदवारी न मिळाल्याने संदीप जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र अमित साटम यांनी भविष्यात भाजप कार्यकारिणीत स्थान देण्याचे आणि सन्मान राखण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.
Expulsion of city president : चंद्रपूर भाजपमध्ये भूकंप; सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ हकालपट्टी
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उसळलेली ही नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट हस्तक्षेपामुळे कितपत शांत होते, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. निष्ठावंतांचं बंड थंड करण्यासाठी वापरला जात असलेला हा ‘फडणवीस फॉर्म्युला’ भाजपला किती दिलासा देतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.








