Ajit Pawar hints early elections in districts with less 50 percent reservation : ५० टक्क्यांखालील आरक्षण असलेल्या जिल्ह्यांत आधी निवडणुका अजित पवारांचे संकेत
Koregaon bhima: राज्यातील महापालिका निवडणुकांचा सावळा-गोंधळ अद्याप पूर्णपणे संपलेला नसतानाच जिल्हा परिषद म्हणजेच ‘मिनी मंत्रालय’च्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता व्यक्त करत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतरच जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया पुढे जाईल, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले.
कोरेगाव-भीमा येथे २०८ व्या शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले. थंडीचा विचार करून आवश्यक त्या सर्व सुविधा, निधी आणि सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुपारनंतर गर्दी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याच वेळी बोलताना अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेबाबत मोठे विधान केले. सध्या महानगरपालिकांसाठी आचारसंहिता लागू असून, त्या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र हा संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाचा असून, आचारसंहितेमुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Municipal election : बंडोबांना थंड करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात
आरक्षणाच्या मुद्द्यावरही अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत आणणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे, त्या जिल्ह्यांच्या निवडणुका आधी घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
राजकीय समीकरणांबाबत बोलताना अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता सूचित केली. यासंदर्भात आजच उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या भागातील सत्तासमीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे.
जागावाटप आणि उमेदवारीबाबतही अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागांतील जागावाटपाचा तिढा सुटेल. ज्या ठिकाणी बी-फॉर्म दिले गेले आहेत, तेथे आवश्यक असल्यास ते मागे घेतले जातील. आमची सचिन खरात यांच्याशी युती असून काही जागा त्यांना देण्यात आल्या आहेत. युतीमध्ये जागा कोणाला द्यायच्या हा संबंधित पक्षाचा अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हेगारांना तिकीट दिले नसल्याचा दावाही त्यांनी केला.
Cabinet meeting : अंबादेवी संस्थानाला चिखलदरातील ३ एकर ८ आर जमीन विनामूल्य देण्यास मंजुरी
शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीबाबत गोंधळाचे वातावरण होते. काही ठिकाणी तुतारी चिन्हावर उमेदवार देण्यात आले असून, काही ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून, रात्री बसून काही जागांबाबत मार्ग निघतो का ते पाहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी आपण बीडला रवाना होत असल्याची माहिती देत, शिंदे शिवसेनेसह काही ठिकाणी चर्चा सुरू असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. एकूणच महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार असून, मिनी मंत्रालयासाठीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असल्याने राज्यातील राजकारण आणखी तापण्याचे संकेत मिळाले आहेत.








