व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local body election : जादूटोण्याच्या आरोपांपासून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीपर्यंत…

Local body election : जादूटोण्याच्या आरोपांपासून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीपर्यंत…

Objections to election process, crimes against 17 officers, employees in absentia cases: निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप, १७ अधिकारी – कर्मचाऱ्यांवर गैरहजर प्रकरणी गुन्हे

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक घटना समोर येत असून, अंधश्रद्धा आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फुलंब्री नगरपंचायतीतील एका पराभूत उमेदवाराने जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप करत थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी नियुक्त १७ अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक २० डिसेंबर रोजी पार पडली. मात्र मतदानाच्या दोन दिवस आधी प्रभाग क्रमांक ९ मधील भारत माता मतदान केंद्राच्या समोर कथित जादूटोण्याशी संबंधित साहित्य आढळून आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली होती. शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार अमित वाहुळ यांनी या प्रकाराचा थेट मतदानावर परिणाम झाल्याचा आरोप केला आहे. जादूटोण्यामुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक मतदारांनी मतदानाचा निर्णय बदलल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Local Body Elections : काँग्रेस–शिंदेसेना बलाढ्य असूनही सत्तेची चावी तिसऱ्याच हातात!

निवडणूक ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया असताना अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे अमित वाहुळ यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाला असल्याचा ठाम आरोप करत त्यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासन काय भूमिका घेते आणि गुन्हा दाखल होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणूक तयारीतही गंभीर प्रकार समोर आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी स्थिर सर्वेक्षण पथकात नियुक्त करण्यात आलेले एकूण १७ अधिकारी आणि कर्मचारी कामावर रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांनी स्वतःची माहिती नोंदवताना दिलेले मोबाइल क्रमांक चुकीचे असल्याचेही स्पष्ट झाले होते. संबंधित कार्यालयांमार्फत संपर्क साधून त्यांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या, मात्र तरीदेखील ते निवडणुकीच्या कामावर रुजू झाले नाहीत.

या गंभीर बाबीची दखल घेत महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध नियमानुसार गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत अशा प्रकारची निष्काळजीपणा आणि गैरहजेरी अक्षम्य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Amravati Municipal Corporation Election : काँग्रेसजनांना उमेदवारी दिल्याचा भाजपवर आरोप

एकीकडे अंधश्रद्धेच्या आरोपांमुळे निवडणूक निकालांवर प्रश्न उपस्थित होत असताना, दुसरीकडे प्रशासनातील हलगर्जीपणामुळेही लोकशाही प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येत असल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिसून येत आहे. अशा घटनांवर कडक कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!