Uddhav and Raj share the same stage in Nashik after 22 years : २२ वर्षांनंतर उद्धव-राज एकाच व्यासपीठावर; भाजपच्या ‘नेते भरती’वर राजकीय प्रहार
Nashik तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आल्याने या सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले. मात्र, या सभेत दोन्ही नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यांऐवजी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यपद्धतीवर आणि फोडाफोडीच्या राजकारणावर आपली तोफ डागल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमध्ये वर्चस्व राखण्यासाठी ठाकरे गटाने आता थेट युतीची भाषा करत सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे केले आहे.
सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सध्याच्या पक्ष विस्ताराच्या पद्धतीवर सडकून टीका केली. “नाशिक दत्तक घेण्याची भाषा करणाऱ्यांना आता दुसऱ्या पक्षातील नेते दत्तक घ्यावे लागत आहेत,” असे म्हणत त्यांनी भाजपमध्ये झालेल्या इनकमिंगचा मुद्दा उचलून धरला. बाहेरील नेत्यांमुळे भाजपमधील निष्ठावंतांची गळचेपी होत असल्याचा दावा करत, त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही टीका प्रामुख्याने नाशिकमधील भाजपच्या स्थानिक गणितांना धक्का लावण्यासाठी करण्यात आल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यातील निवडणुका ४ वर्षे लांबणीवर पडल्याबद्दल प्रशासकीय आणि राजकीय दिरंगाईवर बोट ठेवले. तसेच, अलीकडेच झालेल्या ‘बिनविरोध’ निवडीच्या प्रक्रियेवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. “कल्याणमध्ये उमेदवारांना १५ कोटींच्या ऑफर दिल्या जात आहेत,” असा खळबळजनक दावा करत त्यांनी निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या वापराकडे लक्ष वेधले. भाजपसारखा जुना पक्ष आज भाडोत्री उमेदवारांच्या जोरावर निवडणूक लढवत असल्याची जहरी टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीवर संशय व्यक्त केला.
Municipal Elections : फक्त परवानगी द्या, शिंदेंचा टांगा पलटीच नाही तर घोडेही बेपत्ता करू
या संयुक्त सभेचा मुख्य उद्देश आगामी निवडणुकीत मराठी मतांचे ध्रुवीकरण करणे हाच असल्याचे दिसून आले. “आम्ही भावी पिढ्यांसाठी एकत्र आलो आहोत,” असे सांगत ठाकरे बंधूंनी मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येऊन भाजप आणि शिंदे गटाच्या मतपेढीला खिंडार पाडण्याची ही एक मोठी राजकीय चाल मानली जात आहे. या सभेनंतर नाशिकमधील महायुतीच्या गोटात कोणती हालचाल होते आणि या टीकेला भाजप काय उत्तर देते, यावर नाशिकच्या महापालिका निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.








