Sharing video of beating former corporator, Danve makes serious allegations against Save : माजी नगरसेवकाच्या मारहाणीचा व्हिडीओ शेअर करत दानवेंचा सावेंवर गंभीर आरोप
Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील सत्ताधाऱ्यांवर पुन्हा कायदा – सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून टीकेची झोड उठली असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक धक्कादायक मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर करत मंत्री अतुल सावे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. या व्हिडीओतील मारहाण करणारा व्यक्ती हा अतुल सावे यांचा निकटवर्तीय असून तो माजी नगरसेवक असल्याचा दावा दानवेंनी केला आहे.
अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, क्रूरता समोर आल्यावर कुणी मंत्रीपद गमावतो, कुणी तुरुंगात जातो. मात्र मंत्री अतुल सावे यांचा ‘खास माणूस’ असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला भीक घालत नाही. सत्तेच्या छत्राखाली गुन्हेगारांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधारी यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Ladki bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचे पैसे निवडणुकीनंतरच द्यावेत !
या प्रकरणात दानवेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले आहे. पार्टी विथ डिफरन्सच्या छत्राखाली अशा धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार, असा सवाल करत त्यांनी दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला. सत्तेच्या माजात पीडिताचा आवाज कायमचाच दबून गेला आहे का, अशी चिंता व्यक्त करत दानवेंनी या घटनेतील पीडिताच्या सुरक्षिततेवरही बोट ठेवले आहे.
दानवे म्हणाले की, ज्यांच्या हातात कायदा आहे त्यांनी गुन्हेगारांची भक्ती करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. सत्तेची ऊब मिळाली की गुन्हेगारांचे हात कोणीही बांधत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव असल्याची टीकाही त्यांनी केली. बरोबर ना देवाभाऊ, असा थेट सवाल करत त्यांनी सत्तेतील जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, माध्यमाशी बोलताना अंबादास दानवे यांनी या प्रकरणाबाबत अधिक गंभीर आरोप केले. हा माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा असून तो संभाजीनगरचे मंत्री अतुल सावे यांचा निकटवर्तीय असल्याचे त्यांनी सांगितले. एका व्यक्तीच्या डोक्यात इतका मोठा दगड घालण्याइतकी मस्ती त्याच्यात आली कुठून, असा सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणात अद्याप साधा गुन्हाही दाखल न झाल्याबद्दल पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दानवे यांच्या म्हणण्यानुसार, या भागात अनधिकृत बांधकामांबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या असून संबंधित व्यक्ती विविध बेकायदेशीर धंद्यांमध्ये गुंतलेला आहे. तरीही सत्तेच्या जोरावर त्याला वाचवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे सांगत, हा व्हिडीओ एक ते दोन महिन्यांपूर्वीचा असतानाही अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महायुतीवर ‘पाईप चोर, गुन्हेगारांना मत द्या’ असे सांगण्याची वेळ
या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून, अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री अतुल सावे काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








