Asaduddin Owaisi : ‘डरेगे तो मरेंगे!’; अमरावतीत ओवेसींचा मतदारांना इशारा

Muslim leader targets Centre over China policy : ‘पंजा’ कधीच आपला नव्हता; केंद्र सरकारच्या चीन धोरणावरही टीका

Amravati एमआयएमचे (MIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी अमरावतीच्या वलगाव रोडवरील ॲकॅडेमिक हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत सर्वच प्रस्थापित आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांवर सडकून टीका केली. “जुलमी सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याची क्षमता आता या पक्षांमध्ये उरलेली नाही, त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहणे म्हणजे केवळ स्वतःच्या मतांचा अपव्यय करणे होय,” अशा जहाल शब्दांत ओवेसी यांनी उपस्थितांना संबोधित केले. सुमारे ३४ मिनिटांच्या आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि स्थानिक युवा स्वाभिमान पक्षालाही लक्ष्य केले.

सभेमध्ये ओवेसी यांनी ‘कमळ’, ‘पाना’, ‘हात’ आणि ‘घड्याळ’ या चिन्हांचा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार प्रहार केला. विशेषतः काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, “काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत असतानाच अल्पसंख्याकांवर अन्याय झाला आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी कठोर कायदे बनवण्यात आले. ‘युएपीए’ (UAPA) सारखा जाचक कायदा काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम गृहमंत्री असतानाच लागू झाला होता, त्यामुळे ‘पंजा’ कधीच आपला मित्र नव्हता.” तसेच, सध्याचे ‘घड्याळ’ मोदी सरकारसोबत असून युवा स्वाभिमान पक्षाचा ‘पाना’ देखील त्यांचाच जोडीदार असल्याने त्यांना मत देणे धोक्याचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Amravati Municipal Corporation : जिथे वायएसपीला जागा, तिथे आता अपक्षांना पाठिंबा

अल्पसंख्याकांना आतापर्यंत केवळ वापरून घेतले गेले असून त्यांना योग्य नेतृत्व मिळाले नसल्याची खंत ओवेसी यांनी व्यक्त केली. “मी समाजाला सजग करण्याचे काम करत असल्यामुळे अनेक जण माझा द्वेष करतात, मात्र मी कोणालाही घाबरत नाही. या जगात फक्त अल्लाहला घाबरले पाहिजे, इतर कोणालाही नाही,” असे सांगत त्यांनी ‘डरेगे तो मरेंगे’ या घोषणेसह उपस्थितांना निर्भय होण्याचे आवाहन केले. राज्यातील शाळांची दयनीय अवस्था, बिकट आरोग्य व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यांवरून त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही जबाबदार धरले.

Local Body Elections : न. प. निवडणुकीत मतदारांची उघड नाराजी

भाषणाच्या शेवटी ओवेसी यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर, विशेषतः चीनच्या मुद्द्यावर तीव्र आक्षेप घेतला. “चीनने भारताची सुमारे १५ हजार चौरस किलोमीटर जमीन बळकावून त्यावर लष्करी चौक्या उभारल्या आहेत. भारताविरुद्ध कट रचणाऱ्या पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनलाच केंद्र सरकार गुंतवणुकीसाठी पायघड्या घालत आहे. हा स्वतःला देशभक्त म्हणवून घेणाऱ्या भाजप आणि संघाचा देशद्रोह नाही काय?” असा बोचरा सवाल ओवेसींनी उपस्थित केला. या सभेमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून आगामी निवडणुकांवर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.