Chandrapur has rejected the lying Congress before and will reject it now too, Sudhir Mungantiwar attack : खोटारड्या काँग्रेसला चंद्रपूरने आधीही नाकारले आताही नाकारणार, सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात
Chandrapur : वडेट्टीवारांकडून केले जाणारे आरोप हे सत्य लपवण्यासाठी उभारलेले भुलभुलय्याच असल्याचा घणाघात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. खोटारड्या काँग्रेसला चंद्रपूरने आधीही नाकारले आताही नाकारणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विकासाच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी दिशाभूल करणाऱ्या आरोपांचा मारा करून जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसच्या राजकारणाची जोरदार खिल्ली उडवली आहे. काँग्रेस म्हणजे खोट्या आश्वासनांचा कारखाना असून, जनतेला फसवून सत्ता मिळवण्याचा त्यांचा जुना इतिहास आहे, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या विकासावर बोलण्याची नैतिकताच काँग्रेसने गमावली*
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेसने आजपर्यंत शहराच्या विकासासाठी कोणतीही ठोस दिशा दिलेली नाही. निवडणूक आली की नवीन स्वप्न दाखवायचे आणि निवडणूक गेली की हातावर हात ठेवून बसायचे, हीच काँग्रेसची कार्यपद्धती आहे. विजय वडेट्टीवार यांनी विकासावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीत काय काम केले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
मुनगंटीवार यांनी आरोप केला की, काँग्रेस सत्तेत आली तर महानगरपालिकेच्या माध्यमातून दारूची दुकाने वाढतील, भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाईल आणि सर्वसामान्य कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. महिलांसाठी, गरीबांसाठी आणि तरुणांसाठी कोणतीही दीर्घकालीन योजना काँग्रेसकडे नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भारतीय जनता पार्टीने चंद्रपूरमध्ये शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष विकास केला आहे. भाषणांमध्ये पण विकासाचा शब्द न वापरणाऱ्या काँग्रेसला जनता आता ओळखून आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चंद्रपूरचा मतदार काँग्रेसला पुन्हा ठाम नकार देईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.








