Opposing ideologies unite for math of power, sparking new discussions in politics : सत्तेच्या गणितासाठी विरोधी विचारधारा एकत्र, राजकारणात नव्या चर्चांना उधाण
Amaravati: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. अशा वातावरणात आता भाजप आणि एमआयएमने थेट युती केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. निवडणुकीपूर्वी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलतील, अशी अपेक्षा होती. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काहीतरी वेगळं घडेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र प्रत्यक्ष निकालांमध्ये भाजपानेच बहुतेक महापालिकांमध्ये आघाडी घेत आपली ताकद सिद्ध केली. मुंबई महापालिकेतही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून महापौरपद युतीकडे जाणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Municipal Elections : मनसेच्या शिंदेसेनेला दिलेल्या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे नाराज
मुंबईसह इतर काही महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युती करून निवडणुका लढवल्या होत्या. दोन्ही पक्षांची कामगिरी चांगली राहिली. दरम्यान, या निवडणुकांमध्ये एमआयएमनेही मोठी मुसंडी मारत अनेक महापालिकांमध्ये लक्षणीय यश मिळवलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची कामगिरी विशेष ठरली, तर मुंबई महापालिकेतही पक्षाला अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळालं. मात्र विरोधकांकडून एमआयएमला अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठिंबा असल्याचे आरोप सातत्याने केले जात होते.
या पार्श्वभूमीवर आता अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम थेट एकत्र आल्याचं समोर आलं आहे. समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजप आणि एमआयएमने एकमेकांना पाठिंबा दिला. या युतीतून एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापती पद मिळालं आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
BMC Elections: भाजपच्या बंडखोरीचा फटका, मुंबईत 11 जागांवर पराभव
अचलपूरमध्ये एमआयएमचे तीन नगरसेवक, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक आणि तीन अपक्ष नगरसेवक असा गट भाजपासोबत गेल्याची माहिती आहे. या नव्या समीकरणामुळे नगरपरिषदेत सत्तासंतुलन बदललं असून, सत्तेसाठी विचारधारेपेक्षा आकड्यांचं गणित अधिक महत्त्वाचं ठरत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे.
एमआयएम आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकमेकांच्या पूर्णपणे विरोधी मानल्या जातात. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असा विचारही यापूर्वी कोणी केला नव्हता. मात्र अमरावतीच्या अचलपूरमध्ये हे प्रत्यक्षात घडल्याने राजकारणात ‘सत्तेसाठी काहीही’ या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळालं आहे. आगामी काळात अशा युतींचा परिणाम जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.








