Victory from Thackeray’s stronghold; Special mention in Fadnavis rally : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून विजय; फडणवीसांच्या सभेत विशेष उल्लेख
Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर होताच मुंबईत पुढील महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेविका शीतल गंभीर-देसाई यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंबई महापालिकेवर आगामी काळात महिला महापौर असणार हे स्पष्ट झाले असून भाजपकडून शीतल गंभीर-देसाई यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शीतल गंभीर-देसाई यांनी वॉर्ड क्रमांक १९० मधून विजय मिळवला होता. विशेष म्हणजे या मतदारसंघात त्यांची लढत ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर यांच्याशी होती आणि या अटीतटीच्या लढतीत शीतल गंभीर-देसाई यांनी अवघ्या १२५ मतांनी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली होती.
Maharashtra politics : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी भाजपकडून ठाकरे बंधूंना डिवचणारे बॅनर
शीतल गंभीर-देसाई या शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांच्या कन्या असून त्या दुसऱ्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. माहिम-दादर विधानसभा परिसर हा ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच भागातून भाजपची एकमेव नगरसेविका म्हणून शीतल गंभीर-देसाई यांनी विजय मिळवला असून त्यामुळे त्यांचे राजकीय वजन अधिक वाढले आहे.
भाजप महिला मोर्चाच्या नेत्या म्हणूनही शीतल गंभीर-देसाई यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांच्या कामाची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली होती. शिवाजी पार्कवरील एका सभेत फडणवीस यांनी शीतल गंभीर-देसाई यांच्या कार्याचे कौतुक करत, आदित्य ठाकरेंवर टीका करताना त्यांना उत्तर देण्यासाठी माझी गरज नाही, आमच्या उमेदवार शीतल गंभीर पुरेशा आहेत, असे विधान केले होते. या उल्लेखामुळे त्या अधिक चर्चेत आल्या होत्या.
Akola Politics : निवडणुका सरताच नेत्यांना आली आठवण; रखडलेल्या विकासकामांचा ‘पाहणी’!
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचा आतापर्यंतचा आरक्षण इतिहास पाहता, २०२६ मध्ये महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून यंदा महिला महापौर होणार हे निश्चित झाले आहे. २००९ मध्ये श्रद्धा जाधव, २०१४ मध्ये स्नेहल आंबेकर आणि २०२० मध्ये किशोरी पेडणेकर यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. आता पुन्हा एकदा मुंबईला महिला महापौर मिळणार असून भाजपकडून शीतल गंभीर-देसाई यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर मानले जात आहे.
मुंबई महापालिकेच्या अंतिम निकालानुसार भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे ६५, शिवसेनेकडे २९, काँग्रेसकडे २४, मनसेकडे ६, एमआयएमकडे ८, तर अन्य पक्षांकडे मिळून काही मोजक्या जागा आहेत. या राजकीय अंकगणिताच्या पार्श्वभूमीवर महापौरपदासाठी भाजपची भूमिका मजबूत असून, शीतल गंभीर-देसाई यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होते का, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.








